सिडकोसह पालिकेतील भ्रष्टाचार थांबवा
By Admin | Updated: October 14, 2015 02:58 IST2015-10-14T02:58:16+5:302015-10-14T02:58:16+5:30
सिडकोसह महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक होत आहे. भ्रष्टाचार वाढू लागला असून, बिल्डरांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे

सिडकोसह पालिकेतील भ्रष्टाचार थांबवा
नवी मुंबई : सिडकोसह महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक होत आहे. भ्रष्टाचार वाढू लागला असून, बिल्डरांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशी मागणी शहरातील व्यावसायिकांनी केली आहे.
ठाणे येथील बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यावसायिकांना ४५ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. परवानग्या वेळेत मिळत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून, प्रशासनामधील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी, धर्मेंद्र कारिया, भुपेन शहा, हरीश छेडा, सतीश सबलोक, बच्चूभाई पटेल व इतर बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)