नवी मुंबई : भांडणाच्या बहाण्याने पाकीटमारी करणाऱ्या महिलांच्या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक वृध्द महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. मुलुंड व भांडूप परिसरातल्या या महिला असून गर्दीच्या ठिकाणी आपसात भांडणाचे नाटक करून बघ्याचे पाकीट चोरायच्या.रविवारी एका ग्राहकाने वाशी पोलिसांकडे त्याचे पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास गायकवाड यांनी सदर ठिकाणाची पाहणी केली होती. यावेळी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता, काही महिला आपसात भांडण करताना दिसून आल्या. त्याच महिलांनी या व्यक्तीचे पाकीट चोरल्याचेही दिसून आले. त्यामुळे काही वेळातच पोलिसांच्या पथकाने परिसरातील दुकानांची झाडाझडती घेण्याला सुरवात केली. यावेळी काही अंतरावरच या महिला आढळून आल्या. सुरवातीला त्यांना काही महिलांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावर हल्ला करून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये टोळीतील एक वृध्द महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान, गायकवाड यांच्या पथकाने या पाकीटमार टोळीच्या तिघींना ताब्यात घेवून अटक केली. त्यामध्ये दोन महिला व एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. स्वाती जाधव व सारिका सिदापूर अशी त्यांची नावे आहेत. स्वाती मुलुंडची तर सारिका भांडूपची राहणारी आहे. या महिला गर्दीच्या ठिकाणी जाऊन आपसात भांडणाचे नाटक करायच्या. यावेळी त्यांच्या इतर साथीदार महिला भांडण बघण्यासाठी जमलेल्यांचे पाकीट मारायच्या. (प्रतिनिधी)
वाशीमध्ये चोरी करणाऱ्या महिलांना अटक
By admin | Updated: March 21, 2017 02:06 IST