शेअर टॅक्सी चालकांचा धुमाकूळ
By Admin | Updated: December 28, 2014 00:35 IST2014-12-28T00:35:39+5:302014-12-28T00:35:39+5:30
माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून धारावी आणि अॅस्टीला बॅटरी या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत टॅक्सीचालकांनी धुमाकूळ घातला आहे.

शेअर टॅक्सी चालकांचा धुमाकूळ
मुंबई : माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून धारावी आणि अॅस्टीला बॅटरी या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत टॅक्सीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. येथून सुटणाऱ्या अनधिकृत शेअर टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू असून महिला प्रवाशांची खुलेआम छेडछाड होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दादागिरी सुरू असलेल्या टॅक्सीचालकांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा स्थानिक पोलीस स्टेशनवर मोर्चा काढतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून शेअर टॅक्सी सुरू आहेत. धारावी पोलीस स्टेशनपर्यंत प्रवाशांकडून प्रत्येकी १0 रुपये घेण्यात येतात. तर माटुंगा रोड ते माटुंगा लेबर कॅम्पपर्यंत एका प्रवाशाकडून सात ते दहा रुपये आकारण्यात येतात. एका टॅक्सीत सुमारे सहा ते सात प्रवाशांना कोंबण्यात येते. महिला आणि मुलींनाही गर्दीत दाटीवाटीने बसविण्यात येते. शेअर टॅक्सी थांब्यांवर महिला, मुलींची खुलेआम छेडछाड सुरू असते. मात्र, भीतीपोटी महिला कुजबुज न करता आपला मार्ग धरतात.
शेअर टॅक्सी थांब्यामुळे सायन-धारावी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. २१ रुपयांचा मीटर होत असलेल्या ठिकाणासाठीही टॅक्सीचालकांकडून प्रत्येकी ७ ते १0 रुपये वसूल करण्यात येतात. एका टॅक्सीत सुमारे सहा प्रवाशांना बसविण्यात येत असल्याने टॅक्सीचालकाला सुमारे दुप्पट फायदा होतो. सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची संख्या अधिक असल्याने माटुंगा रेल्वे स्टेशन येथे टॅक्सीचालकांची दादगिरी सुरू असते. एकट्या प्रवाशाला प्रवास करायचा असल्यास येथून टॅक्सी मिळविण्यासाठी दिव्य करावे लागते.
रात्रीच्या वेळी टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे येथून सुटणाऱ्या शेअर टॅक्सीचालकांविरोधात प्रवाशांची तीव्र नाराजी आहे. दिवसा येथून जाण्यास बेस्ट बस पर्याय असला तरी ती एका तासानंतर येत असल्याने प्रवाशांना शेअर टॅक्सीवर विसंबून राहावे लागते.
शेअर टॅक्सीचालकांकडून महिलांची छेडछाड सुरू असल्याने या टॅक्सींवर बंदी घालावी, अशी मागणी दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय भालेराव यांनी शाहूनगर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेअर टॅक्सीचालकांच्या दादागिरीबाबत प्रवाशांनी वारंवार वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शेअर टॅक्सीचे भाव निर्धारित करावेत आणि महिलांची होणारी छेडछाड पोलिसांनी रोखावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. (प्रतिनिधी)
शेअर टॅक्सी थांब्यामुळे सायन-धारावी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. २१ रुपयांचा मीटर होत असलेल्या ठिकाणासाठीही टॅक्सीचालकांकडून प्रत्येकी ७ ते १0 रुपये वसूल करण्यात येतात.
रात्रीच्या वेळी टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे येथून सुटणाऱ्या शेअर टॅक्सीचालकांविरोधात प्रवाशांची तीव्र नाराजी आहे. दिवसा येथून जाण्यास बेस्ट बस पर्याय असला तरी ती एका तासानंतर येत असल्याने प्रवाशांना शेअर टॅक्सीवर विसंबून राहावे लागते.