बेलापूर ते एलिफंटा बोटसेवा सुरू
By Admin | Updated: March 2, 2016 02:10 IST2016-03-02T02:10:28+5:302016-03-02T02:10:28+5:30
शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरी बोटसेवा सुुरू झाली आहे.

बेलापूर ते एलिफंटा बोटसेवा सुरू
नवी मुंबई : शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरी बोटसेवा सुुरू झाली आहे. नवी मुंबईच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अरबी समुद्रात वसलेल्या एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र नवी मुंबईकरांना ही लेणी पाहायची असतील तर नवी मुंबईतून या ठिकाणी जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. ही जलप्रवासाची सोय नवी मुंबई शहरवासीयांबरोबरच इतर सर्व पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने प्रवासी फेरी बोट सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध शासकीय खाती, संस्था तसेच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. आता आवश्यक त्या सर्व परवानग्या संस्थेने प्राप्त केल्याची माहिती संस्थेचे सचिव हेमंत भोईर यांनी दिली. बेलापूर, रेतीबंदर सेक्टर १५ येथील तरंगत्या जेट्टीवरून बेलापूर ते एलिफं टा या मार्गावर दररोज दोन प्रवासी बोट फेऱ्या होणार आहेत.
बेलापूरच्या जेट्टीची बांधणी आधुनिक पध्दतीने करण्यात आली असून, ती तरंगती असल्याने समुद्राच्या भरतीप्रमाणे ती खाली-वर होत असते. पावसाळा सुरू होईपर्यंत या वर्षी पर्यटकांना या प्रवासी बोट फेरीचा आनंद घेता येणार आहे. पावसाळ्यात ही सेवा बंद होणार असून, पावसाळा संपला की पुन्हा एकदा सुरू होणार आहे. प्रवासी सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली जाणार असून, याकरिता लाइफ जॅकेट, पाण्याची खोली मोजणारी आधुनिक यंत्रणा, पाण्यावर तरंगणाऱ्या रिंग,जीपीएस प्रणाली अशा विविध सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. पूणे, ठाणे या शहरांप्रमाणेच नवी मुंबईलगत इतर शहरांमधील पर्यटकांनादेखील एलिफंटाला भेट देण्यासाठी ही प्रवासी फेरी पैशाची आणि वेळेची बचत करणारी सेवा ठरणार आहे. ४५ प्रवासी आसन क्षमता असलेल्या या बेलापूर ते एलिफंटा दुहेरी प्रवासाचे भाडे २८० रु पये आहे. बेलापूरमधून निघाल्यावर या बोटीतून २० मिनिटांत एलिफंटाला पोहोचतो. मंगळवार ते शुक्रवार सकाळी ९.३० वाजता पहिली प्रवासी फेरी बोट एलिफंटासाठी निघेल. ही बोट दुपारी १ वाजता पुन्हा बेलापूर जेट्टीत परतेल. शनिवार आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पहिली प्रवासी फेरी बोट एलिफंटासाठी निघेल आणि दुपारी १ वाजता परतेल, तर पुन्हा दुपारी २ वाजता निघेल आणि सायंकाळी ५.३० वाजता परतेल.