लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आॅक्टोबरमध्ये नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर ‘फिफा’ वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर ‘फिफा’ आयोजकांसह शिवसेना नेत्यांनी गुरुवारी स्टेडियमची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. या वेळी प्रेक्षकांच्या बैठकव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यात आली.भारतात प्रथमच १७ वर्षांखालील फुटबॉल चषक स्पर्धा (फिफा) आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. हे सामने खेळण्याकरिता नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी गतआठवड्यात स्टेडियमची पाहणी केली आहे. क्रिकेटप्रमाणेच देशात फुटबॉलचाही प्रचार करण्याच्या उद्देशाने हे सामने खेळले जात आहेत. यामध्ये २४ देश सहभागी होणार असून, २१ संघांचा समावेश असणार आहे. या खेळाचे ५२ सामने डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण देशाचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. त्यानुसार शिवसेना नेत्यांनीही गुरुवारी स्टेडियमची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार राजन विचारे, पालिका आयुक्त रामास्वामी एन., पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, ‘फिफा’चे संचालक जेविअर सेप्पी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. त्यांनी स्टेडियमची पाहणी करून स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली.
‘फिफा’च्या पार्श्वभूमीवर स्टेडियमची पाहणी
By admin | Updated: May 26, 2017 00:26 IST