दिंडीच्या माध्यमातून दिला सामाजिक संदेश
By Admin | Updated: July 16, 2016 02:08 IST2016-07-16T02:08:37+5:302016-07-16T02:08:37+5:30
लोकमत माध्यम प्रायोजक आणि सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते

दिंडीच्या माध्यमातून दिला सामाजिक संदेश
नवी मुंबई : लोकमत माध्यम प्रायोजक आणि सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. माउलींचा जयघोष करत सीबीडी परिसरातून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती केली. बालवारकऱ्यांनी स्वत: तयार केलेले जल हैं तो कल हैं, झाडे लावा झाडे जगवा, रस्ता सुरक्षा अशा विविध घोषणा फलकांनी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृतीही केली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीतून एकात्मतेचा संदेश दिला जात असून, याच एकतेमधून पर्यावरण संवर्धनाविषयी सकारात्मक पाऊल उचलण्याच्या दृष्टीने या आगळ््या वेगळ््या दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी पालखी पूजन, विठूनामाचा गजर, पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदंगाचा नाद याचबरोबर पर्यावरण जपण्याचे प्रयत्न या माध्यमातून केल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कासारे यांनी दिली. दिंडीमध्ये साडेसहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ््यात विद्यार्थ्यांबरोबरच शाळेचे शिक्षकवृंदही सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची माहितीही देण्यात आली. सामाजिक संदेश देणाऱ्या या दिंडी सोहळ््यातून संपूर्ण सीबीडी परिसरात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला. आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व सांगतानाच या दिंडीच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्यात आला.
याप्रसंगी दिंडी कार्यक्रमात शाळेचे पर्यवेक्षक एकनाथ दांडगे, शिक्षक नरेश लोहार, आर. बोबडे, समीर कोकाटे, रामचंद्र देवकर, प्राथमिक विभागाच्या मैथिली कदम आदी मान्यवर उपस्थित होते.