लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई/ पनवेल : वाशी सेक्टर १४ येथील रहेजा रेसिडेन्सी या १२ मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या जैन कुटुंबाकडे दिवाळीनिमित्ताने पाहुणे आले होते. रात्री १२:४५ च्या सुमारास घरातील एसीमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर काही क्षणांतच आगीचा भडका उडाल्याने कुटुंबातील सर्वांनी बाहेर पळ काढला.
मात्र, अर्धांगवायू झालेल्या व बेडवर झोपून असलेल्या कमला जैन (८१) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील पती-पत्नी व सहा वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. सुंदर बालकृष्णन (४४), पूजा बालकृष्णन (३९) व वेदिका बालकृष्णन (६) अशी त्यांची नावे आहेत.
दहाव्या मजल्यावरील जैन यांच्या घरात लागलेली आग डक्टमधून अकराव्या व बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. दरम्यान, दहाव्या मजल्यावर आग लागल्याने अकराव्या व बाराव्या मजल्यावरील व्यक्तींनी घराबाहेर निघून टेरेसवर धाव घेतली होती. यादरम्यान झालेल्या धावपळीत काहींना आगीच्या झळा बसल्या तर काहींचा श्वास गुदमरला होता. अशा दहा जणांना वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्या सर्वांना उपचार करून सोडण्यात आले आहे.
कामोठेत पहाटे फ्लॅटला आग, माय-लेकींचा दुर्दैवी अंत
पनवेल परिसरातील कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पहाटे लागलेल्या आगीत रेखा शिसोदिया आणि पायल शिसोदिया या मायलेकींचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे या आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तत्पूर्वीच दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडाल्याने दोघींनाही घरातून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही.
एकाच दिवशी ६ आगीच्या घटना, काही फटाक्यांमुळे
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट रोड क्र. ३३ येथील अंबिकानगर भागात आदर्श ऑटो पार्ट्स या गॅरेजला सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली. या घटनेत गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले. मुंब्रा परिसरातील बाबाजी पाटील वाडी येथे एका मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. ही आगही फटाक्यांमुळे लागल्याचा अंदाज आहे.
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील बॅसिलिअस टॉवरच्या ३१ व्या मजल्यावरील घरात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीवर २० मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही; परंतु सोफा व लाकडी साहित्य जळाले.
खोपट परिसरातील मे. जयकार डेकोर दुकानाच्या छतावर ठेवलेल्या प्लास्टिक ताडपत्रीला मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास आग लागली होती. अवघ्या दहा मिनिटांत ही आग नियंत्रणात आली. दरम्यान, वर्तकनगरमधील हब टाऊन रेसिडेन्सी येथील एका बंद फ्लॅटमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनला आग लागली होती. तसेच कळव्यातील विटावा स्मशानभूमीशेजारी साचलेल्या कचऱ्यालाही पहाटे आग लागली होती.
सहा तास धुमसत होती मरोळच्या गोदामाची आग, जीवितहानी नाही
मुंबई : १८ ऑक्टोबर रोजी मरोळ येथील १००० ते ५००० चौरस फूट क्षेत्रफळातील गोदामाला आग लागली. आग गोदामाचा तळमजला आणि वरच्या काही मजल्यांवर पसरली. सकाळी आठ वाजता लागलेली ही आग दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नियंत्रणात आली. तर १९ ऑक्टोबरला मालाड पिंपरीपाडा - पथावडी येथे पाच गाळ्यांना आग लागली. या आगीत फर्निचर, चित्रीकरणाचे साहित्य जळून खाक झाले. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या आगी फटाक्यांमुळे लागल्या नसून अन्य कारणांमुळे लागल्याचा अंदाज आहे.
----००००----
Web Summary : A fire sparked by an AC unit in Navi Mumbai killed four, including an elderly woman and a family of three. Separate fire incidents in Kamothe claimed two more lives, highlighting a day of multiple fire tragedies across the region.
Web Summary : नवी मुंबई में एसी यूनिट से लगी आग में एक बुजुर्ग महिला और तीन सदस्यों के परिवार सहित चार लोगों की मौत हो गई। कामोठे में अलग-अलग आग लगने की घटनाओं में दो और लोगों की जान चली गई, जिससे पूरे क्षेत्र में आग की कई दुखद घटनाएं हुईं।