प्रवेशाच्या बहाण्याने गंडा
By Admin | Updated: September 14, 2015 23:42 IST2015-09-14T23:42:52+5:302015-09-14T23:42:52+5:30
मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

प्रवेशाच्या बहाण्याने गंडा
नवी मुंबई : मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधिताने इतरही अनेकांना फसवल्याची शक्यता आहे.
कामोठे येथे राहणाऱ्या कैलास नडगावकर यांनी फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या पत्नीला मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश हवा होता. एका जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी २०१३ साली शिवप्रसाद यादव याच्याशी संपर्क साधला आणि त्याने दिलेल्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५० हजार रुपये जमा केले होते. परंतु पैसे घेतल्यानंतरही डी फार्मसीसाठी प्रवेश न मिळाल्याने दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी यादवला संपर्क केला असता त्याने टाळाटाळ केली. अखेर फसवणूक प्रकरणी नडगावकर यांनी यादवविरोधात कामोठे पोलिसांकडे तक्रार केली.
नोकरीच्या आमिषाने एकाची फसवणूक
दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. या प्रकारात तरुणाची १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली असून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरीत राहणाऱ्या गौरव चौधरी विदेशात नोकरीच्या शोधात असताना त्याला वाशीतील हावरे बिझनेस पार्कमधील प्लेसमेंट कार्यालयाची माहिती मिळाली. त्याठिकाणी त्याने संपर्क साधला असता तिथल्या रोहितकुमार, अजय मनी व रोहन या नावाच्या व्यक्तींनी त्याची फसवणूक केली. या तिघांनी गौरवला दुबईत नोकरी लावून देतो असे सांगून तब्बल १ लाख ७० हजार लंपास केले.या टोळीच्या जाळ्यात अनेक तरुण फसले असल्याची शक्यता आहे.