स्मार्ट सिटीला मिळाला हिरवा कंदील
By Admin | Updated: December 13, 2015 00:21 IST2015-12-13T00:21:18+5:302015-12-13T00:21:18+5:30
स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागावरून महापालिकेमधील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने फेटाळलेला ठराव
स्मार्ट सिटीला मिळाला हिरवा कंदील
- नामदेव मोरे, नवी मुंबई
स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागावरून महापालिकेमधील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने फेटाळलेला ठराव मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. विरोधकांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. महापालिकेमध्ये दोन सत्तास्थाने झाली असून, त्यामुळे प्रशासनाची मात्र फरपट सुरू झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आठ दिवसांपासून खडाजंगी सुरू झाली आहे. ४ डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादीही या प्रस्तावासाठी अनुकूल होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विदेशी कंपनीबरोबर करार केला व गोंधळ सुरू झाला. नवी मुंबई स्मार्ट सिटी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणार, असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या राष्ट्रवादीने एसपीव्ही प्रणालीस विरोध करून प्रस्तावच फेटाळला. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी स्मार्ट सिटीला नाही, तर त्यामधील एसपीव्हीच्या कमिटीवर आक्षेप घेतले होते. परंतु विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठविले. नागरिकांनीही सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून व नवी मुंबई बंदचा इशारा दिल्यामुळे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन एसपीव्ही प्रणालीमुळे लोकशाहीवर घाला पडणार आहे. हुकूमशाही प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही हा प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले.
भाजपा आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीने फेटाळलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण दाखविले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.