रायगडात घरबसल्या दुकान परवाना
By Admin | Updated: October 12, 2015 04:53 IST2015-10-12T04:53:35+5:302015-10-12T04:53:35+5:30
जिल्ह्यातील दुकानदारांना आता घरबसल्या दुकानाचा परवाना मिळणार असल्याने कार्यालयात फेऱ्या मारण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे

रायगडात घरबसल्या दुकान परवाना
पनवेल : जिल्ह्यातील दुकानदारांना आता घरबसल्या दुकानाचा परवाना मिळणार असल्याने कार्यालयात फेऱ्या मारण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे. संबंधित विभागाने आॅनलाइन प्रणालीचे काम हाती घेतले असून, आठवडाभरात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती दुकाने निरीक्षकांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील दुकानांना परवाना देण्याचे काम कामगार उपायुक्त कार्यालयातून करण्यात येते. पनवेल परिसरातील परवाने खांदा वसाहतीत मिळतात. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, वडघर, करंजाडे, उलवे, नावडे, विचुंबे, आदई, पळस्पे, उसर्ली, सुकापूर या ठिकाणी दुकानांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर उरण, महाड, खोपोली, कर्जत, पेण, अलिबाग, मुरूड, माणगाव या ठिकाणी दरमहिन्याला सुमारे ८०० ते ९०० अर्ज येतात. मूळ मालक असेल, त्याची कागदपत्रं किंवा भाडेतत्त्वावर घेतले असेल तर करारनामा, रहिवासी व ओळखपत्राचा पुरावा या सर्व गोष्टींची पडताळणी करावी लागते. ए व बी अर्जातील मजकूर व स्टेट बँक आँफ इंडियात भरणा केलेली चलने आदी बाबी तपासून मगच परवाना दिला जातो. संपूर्ण जिल्ह्याकरिता दोनच निरीक्षक असून, त्यांचा कामाचा मोठा ताण आहे. आॅनलाइन परवान्यांमुळे निरिक्षकांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.