परदेशात रोवला शिवकार्याचा झेंडा
By Admin | Updated: March 11, 2016 02:48 IST2016-03-11T02:48:12+5:302016-03-11T02:48:12+5:30
जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे.

परदेशात रोवला शिवकार्याचा झेंडा
प्राची सोनवणे, नवी मुंबई
जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८ लाख लोकांमध्ये शिवप्रतिमांचे वाटप करण्यात आले आहे. जुईनगर येथे राहणाऱ्या योगेश खिलारे या तरुणाला नोकरीनिमित्त अमेरिकेला जावे लागले आहे. परदेशी जाऊनही मनातील शिवप्रेम तिळमात्र कमी न होता इतर देशांमध्ये शिवकार्याचा प्रचार करण्याचा निर्धार योगेशने केला आणि वर्षभरात ५००हून अधिक परदेशी नागरिकांना शिवप्रतिमांचे वाटप करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगितली.
व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या सध्याच्या या पिढीला खरोखरच शिवरायांच्या वैचारिक प्रेरणेची गरज असून स्त्रियांविषयीचा आदर, आई-वडिलांविषयीचे प्रेम, कुटुंबाविषयीची आपुलकी तसेच देशसेवा करण्याकरिता तरुणांना अचूक मार्ग दाखविण्याचे कार्य शिवकार्यातून घडत असते, अशी माहिती राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक विजयदादा खिलारे यांनी दिली. लहानपणापासून योगेशवर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असून त्यांची आजी शहाबाई रंगराव खिलारे आणि आजोबा रंगराव चंद्रकांत खिलारे यांच्याकडून शिवकार्याची प्रेरणा मिळाली.
योगेशला एका क्रुझवर ८५ देशातील व्यक्ती एकत्र काम करत असून योगेशच्या वाढदिवसाला तलवारीचा केक तयार करून तेथील परदेशी नागरिकांनी शिवरायांच्या नामाचा जयजयकार करत शुभेच्छांचा वर्षाव केला, हा आठवणीतला किस्सा योगेशने सांगितला. ‘लोकमत’शी बोलताना त्याने, प्रत्येक घराघरात शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. शिवचरित्रातील विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारे असून यामुळे भारताचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना प्रतिमा पाहताच बरेचजण शिवरायांचा इतिहास माहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरात शिवकार्याचा प्रचार व प्रसार सुरू असताना भारतामध्ये मात्र शिवकालीन वास्तूंचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत योगेश यांनी व्यक्त केली, त्याचबरोबर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा इतिहास ज्वलंत असून शिवरायांची युध्दनीती, त्यांचे कर्तृत्व, जबाबदारपणा, आत्मविश्वास, कणखरपणा असे अनेक गुण यामधून घेता येण्यासारखे आहेत. लोकांनी शिवरायांवरील प्रेम मनात कायम ठेवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये शिवकार्याचे बीज पेरणे गरजेचे आहे असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाविषयी महाराजांची खलिते असून शिवकालीन इतिहासापासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचे काम राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने केले जात आहे.