वाशीत शिवसेनेतर्फे काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:21 IST2020-08-10T00:21:53+5:302020-08-10T00:21:56+5:30
नवी मुंबईत उमटले पडसाद; छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन

वाशीत शिवसेनेतर्फे काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध
नवी मुंबई : कर्नाटकमधील मनगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणामुळे नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा रविवारी निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आणि द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सदर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मनगुत्ती गावामध्ये ग्रामपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या असताना भाजप सरकारने रातोरात पुतळा हटविला असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. या आंदोलनाला उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, अतुल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय माने आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.