कामगारांच्या थकबाकीसाठी शिवसेना नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:14 IST2020-01-11T00:14:41+5:302020-01-11T00:14:46+5:30
थकबाकी देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी मंजुरीसाठी जाणिवपूर्वक आणत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी शक्रवार, १० जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत केला.

कामगारांच्या थकबाकीसाठी शिवसेना नगरसेवक आक्रमक
नवी मुंबई : कंत्राटी कामगारांची उर्वरित थकबाकी देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी मंजुरीसाठी जाणिवपूर्वक आणत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी शक्रवार, १० जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत केला. सत्ताधाऱ्यांकडून कामगारांचे शोषण होत असल्याचा आरोप केला, त्यावर स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी आरोपांचे खंडन केले.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्र वारी झाली, या वेळी सभेच्या पटलावर शहरातील विविध नागरी विकासकामांचे प्रस्ताव प्रशासनातर्फे मांडण्यात आले होते. सभा सुरू होताच शिवसेना नगरसेवकांनी कंत्राटी कामगारांची १४ महिन्यांची उर्वरित थकबाकी देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी जाणिवपूर्वक स्थायी समिती सभेत आणत नसल्याचा आरोप केला. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी आणि नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी कंत्राटी कामगारांच्या थकबाकीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला आल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा इशारा दिला. विरोधी पक्षातील नगरसेवक वस्तुस्थिती ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सभा सुरू ठेवून इतर प्रस्ताव मंजूर केल्याचे सभापती गवते यांनी सांगितले. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करीत कंत्राटी कामगारांची उर्वरित थकबाकी रक्कम देण्याची आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समिती सभेतदेखील हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यास सांगितले होते. याबरोबर आणखी इतर प्रस्तावदेखील होते; परंतु झेरॉक्सच्या प्रती वेळेत तयार झाल्या नसल्याने प्रस्ताव आला नाही. वेळ पडल्यास विशेष सभा घेऊन प्रस्ताव पटलावर आणण्यात येईल, असे गवते म्हणाले.