महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांचा धुमाकूळ
By Admin | Updated: March 16, 2017 03:03 IST2017-03-16T03:03:43+5:302017-03-16T03:03:43+5:30
परप्रांतीय मच्छीमार बोटींनी महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत घुसून धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून राज्यातील

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांचा धुमाकूळ
उरण : परप्रांतीय मच्छीमार बोटींनी महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत घुसून धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला लाखो टन मासळीची लूट करीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून कारवाई होत नसल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष आहे.
महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र राज्याचा बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात आदि परराज्यातील सुमारे १५०० मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मच्छीमार बोटी २०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या आहेत. मात्र परप्रांतातून येणाऱ्या मच्छीमार बोटी २०० ते ४२७ हॉर्सपॉवरपर्यंतच्या क्षमतेच्या असतात. अशा मोठ्या हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी अक्षरश: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालतात आणि छोटी मोठी मासळी पकडतात. महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला लाखो टन मासळीची लूट करतात. आधीच राज्यातील मच्छीमार व्यवसाय समुद्रात सातत्याने जाणवणाऱ्या मासळीचा दुष्काळ आणि भेडसाविणाऱ्या इतर समस्यांमुळे पुरता कोलमडला आहे.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे मात्र राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला येणाऱ्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. प्रचंड हॉर्सपॉवर क्षमतेच्या मच्छीमार बोटी राज्यातील हद्दीतील मासळी पळवून नेत आहेत. परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी पकडलेली मासळीही मुंबईच्या ससून डॉक आणि कसारा बंदर (भाऊचा धक्का) येथे उतरून विक्रीही करतात. अनेक परप्रांतीय बोटी मासळीची विक्रीही मुंबई येथेच करीत असल्याने मासळीची आवक वाढते. परिणामी आवक वाढल्याने मासळीचे भाव घसरतात. एकाच परवान्यावर अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी मासळीचा व्यवसाय करीत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणाही धजावत नसल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे.
परप्रांतीय मच्छीमारांची महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाल्याची कबुली मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या विभागाकडून काही परप्रांतीय मच्छीमार बोटींवर कारवाई केल्याची माहितीही संबंधित कार्यालयातून देण्यात आली आहे.