पनवेल येथील स्थलांतरित कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:53 IST2021-05-05T00:52:56+5:302021-05-05T00:53:03+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा : प्रशासनाचे नियम पायदळी

पनवेल येथील स्थलांतरित कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या छायेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून खांदा वसाहतीतील सर्कस मैदानावर मार्केट स्थलांतरित करण्यात आले आहे. तरीदेखील या मार्केटमध्ये दररोज मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. प्रशासनाकडून कोरोना नियमानुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत . पण हा नियम पाळायचा असतो हे मात्र मार्केटमध्ये येणारे विसरल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, ग्राहक असे दररोज सकाळी तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांची वर्दळ होत होती. शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण नागरिकांकडून शासनाने दिलेल्या सूचनेची पायमल्ली केली जात आहे. गर्दी कमी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर १९ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. हे मार्केट २६ एप्रिलपासून खांदा वसाहतीतील सर्कस मैदानावर सोशल डिस्टन्सनुसार सुरु करण्यात आले. याकरिता सर्कस मैदानावर २०० स्टाॅलची व्यवस्था करण्यात आली आहे.तर मार्केटसाठी जागा, लाईट, पाणी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.
स्पीकरवरून दिलेल्या घोषणेचाही उपयोग नाही
मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोना बाबतचे सर्व नियम स्पीकरवरून वारंवार सांगण्यात येत होते. तरीही त्याकडे लक्ष न देता लोकांची गर्दी होत होती. नियम पाळण्यासाठी शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना सांगितले जाते. तसेच नियम पाळले न गेल्यास कारवाई देखील करण्यात येत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.