घणसोलीत सात तास वीजपुरवठा खंडित; दररोज जळतात निकृष्ट दर्जाच्या केबल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:21 IST2020-10-17T00:21:04+5:302020-10-17T00:21:09+5:30
घणसोली चिंचआळी परिसरात आठवड्यातून आठ ते दहा वेळा विजेचा लपंडाव सुरूच असतो.

घणसोलीत सात तास वीजपुरवठा खंडित; दररोज जळतात निकृष्ट दर्जाच्या केबल्स
नवी मुंबई : घणसोली येथील चिंचआळी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या केबलने खंडोबा मंदिराजवळ शुक्रवारी ता.१६ रोजी सकाळी अचानक पेट घेतल्याने, या परिसरातील सलग ७ तास वीजपुरवठा खंडित झाला. निकृष्ट दर्जाच्या भूमिगत केबल टाकण्यात आल्याने वारंवार विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. विजेवर चालणाऱ्या पाण्याच्या मोटार बंद असल्यामुळे येथील रहिवाशांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल झाले, तर ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे.
घणसोली चिंचआळी परिसरात आठवड्यातून आठ ते दहा वेळा विजेचा लपंडाव सुरूच असतो. घणसोली परिसरात काही ग्रामस्थांचा डीपी बॉक्स बसविण्याच्या जागेला विरोध आहे, अशा गंभीर परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी त्वरित केबल्स दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करतात, असे ऐरोलीच्या महावितरणचे अतिरक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांनी सांगितले.
घणसोली, चिंचआळी परिसरात खंडोबा मंदिरालगत केबल्स जळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात गंभीर दखल घेऊन सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. - घनश्याम मढवी, माजी नगरसेवक, घणसोली