सात महागड्या कार जप्त

By Admin | Updated: March 7, 2016 02:43 IST2016-03-07T02:43:19+5:302016-03-07T02:43:19+5:30

कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतकडून पोलिसांनी सात महागड्या कार जप्त केल्या आहेत.

Seven expensive cars seized | सात महागड्या कार जप्त

सात महागड्या कार जप्त

नवी मुंबई : कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतकडून पोलिसांनी सात महागड्या कार जप्त केल्या आहेत. त्याने सुमारे २१ गाड्यांच्या कर्जाचे हप्ते थकवून विविध बँकांची फसवणूक केलेली आहे.
सुमारे ३५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी द्वारका मिल्कचा संचालक कपिल राजपूतचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. त्याच्यावर विविध बँकांमधून महागड्या कार खरेदीसाठी कर्ज घेवून विविध बँकांची फसवणूक केल्याचा देखील गुन्हा दाखल आहे. त्याने विविध बँकांमधून कार खरेदीसाठी कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाची परतफेड न करता बँकांची फसवणूक केली. त्याला वाशी पोलिसांनी अटक केल्याचे समजताच सदर बँकांनी देखील त्याच्याविरोधात तक्रार केल्या. यानुसार २४ कार खरेदीतून विविध बँकांची ९ कोटी ५० लाख रुपयांच्या फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने ६ महागड्या कार जप्त केल्या आहेत. या कार विविध ठिकाणावरुन त्या जप्त केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. फियाट लिनीया (एमएच ४३ एबी ४४६५), मर्सिडीज बेंज (एमएच ४६ एल १२००), फियाट लिनीया (एमएच ०६ एवाय १२१२), कोरोला अ‍ॅल्टिस (एमएच ४३ एएफ ७११०), शेवरलेट क्रुझ (एमएच ४३ एजे ४७५०), आॅडी (एमएच ४६ व्ही १२१३) व मर्सिडिज ( एमएच ४३ एजी ३७७७) अशा या सात कार आहेत. त्यापैकी आॅडी कार कपिल राजपूत याच्याकडून तर मर्सिडीज बेंज ही त्याचा भाऊ मिथिलेश हा वापरत होता. त्याच्या अटकेनंतर पनवेलच्या गार्डन हॉटेलबाहेर पोलिसांना सापडली आहे. एक लिनीया कार कोपरीतील गॅरेजमधून पोलिसांनी जप्त केली आहे. तर दुसरी (एमएच ०६ एवाय १२१२) लिनीया कार राष्ट्रवादीचे पनवेलचे माजी नगरसेवक सुनील मोहोड यांच्याकडून पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय अटकेत असलेला राजपूतचा सी.ए. दीपेश ठक्कर याच्याकडून कोरोला व क्रुझ या दोन कार जप्त झाल्या आहेत. तर मर्सिडिज (एमएच ४३ एजी ३७७७) ही संतोष तळपदे यांच्याकडून जप्त केली आहे.
बँकांची फसवणूक करून राजपूतने घेतलेल्या कार संबंधितांकडे कशा आल्या? त्यांचाही या गुन्ह्यांमध्ये संबंध आहे का? याचा उलगडा गुन्हे शाखेकडून लवकरच होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोहोड यांनाही राजपूतकडून कार घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तर इतर गाड्यांच्या शोधात पोलिसांचे हात शहरातील इतरही अनेक प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seven expensive cars seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.