दागिने विकण्यासाठी ‘तो’ चोर बनला सोनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:40 AM2017-12-07T01:40:21+5:302017-12-07T01:40:29+5:30
बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधाराचे सात वर्षांपासून झवेरी बाजार येथे सोनाराचे दुकान सुरू होते. चोरीचे दागिने सोनाराला निम्म्या किमतीत विकण्याऐवजी स्वत: दुकान उघडून
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधाराचे सात वर्षांपासून झवेरी बाजार येथे सोनाराचे दुकान सुरू होते. चोरीचे दागिने सोनाराला निम्म्या किमतीत विकण्याऐवजी स्वत: दुकान उघडून जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने तो सोनार बनला होता. मात्र, दुसºयांदा देखील त्याचा हा प्रयत्न फसला.
बडोदा बँक लुटण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा (४५) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई, पुणे यासह राज्याबाहेर घरफोडीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला अनेकदा विविध ठिकाणच्या पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नव्हते. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही त्याच्याकडून मुद्देमाल जप्त होईल याबाबत साशंकता होती. चेंबूर येथील धाडसी कारवाईत अटक केलेल्या चौघांमध्ये मुख्य सूत्रधारच अज्जू ऊर्फ लंगडा असल्याची कल्पना देखील सुरवातीला पोलिसांना नव्हती. गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे नाटक करून पोलिसांना चकमा देण्याच्या तो प्रयत्नात होता. दरम्यान, उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी, सहायक निरीक्षक उल्हास कदम, पोलीस नाईक प्रकाश साळुंखे, पोलीस शिपाई सूरज जाधव त्याची चौकशी करत होते. चौकशीदरम्यान त्याची पार्श्वभूमी उघड झाल्याने पोलिसांना चकमा देण्याचा त्याचा बेत फसला. यानंतर पोलिसांनी वापरलेल्या क्लृप्तीने अज्जूच्या इतर चार साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे पाच किलो सोने जप्त करण्यात सूरज पाडवी यांच्या पथकाला यश आले. शिवाय अज्जूचे झवेरी बाजार येथे सोन्याचे दुकान असल्याचेही समोर आले.
प्रत्येक गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने तो त्याठिकाणी विक्रीसाठी ठेवायचा. इतर सोनाराकडे चोरीचे दागिने विकल्यास बाजारभावापेक्षा निम्मी किंमत मिळते. हा तोटा भरून काढण्यासाठी स्वत:चे सोन्याचे दुकान उघडले होते. यानुसार सुमारे सात वर्षांपासून झवेरी बाजारमध्ये त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. चार वर्षांपूर्वी त्याची माहिती मिळाल्याने मुंबई पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई देखील केली होती. यानंतरही त्याने कळंबोली येथील स्वत:च्या मालकीचे घर विकून पुन्हा झवेरी बजारमध्ये दुसरे दुकान थाटले होते.
हे दुकान भवरसिंग राठोड ऊर्फ गेना प्रसाद सांभाळायचा. अज्जूने राठोडला राजस्थानमधील एका गुन्ह्यात जामीन मिळवून दिल्यापासून दोघे संपर्कात होते. यानुसार भवरसिंग राठोड याने गेना प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेतला होता. मात्र, गुन्ह्यासाठी ज्यांची मदत घेतली त्यांना रोख देण्यासाठी चोरीचा ऐवज मालेगावमध्ये विकून रक्कम घेतली होती. यादरम्यान चौघेही पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर सापळा रचून केलेल्या कारवाईत त्यांना अटक झाली.