सुरक्षारक्षक मंडळावर सेनेची धडक
By Admin | Updated: December 22, 2015 00:48 IST2015-12-22T00:48:02+5:302015-12-22T00:48:02+5:30
सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मराठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे.

सुरक्षारक्षक मंडळावर सेनेची धडक
नवी मुंबई : सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मराठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने सानपाडामधील मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा व फसवणूक झालेल्या तरुणांना कामावर घेण्याची मागणी केली आहे.
सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणेमध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून एम. जी. मिश्रा याने मराठी तरुणांकडून लाखो रुपये घेतले आहेत. सुरक्षारक्षक मंडळाची बोगस कागदपत्रे, खोटे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र देवून सुरक्षारक्षकांची नोकरी मिळवून दिली होती. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली आहे. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी फसवणूक झालेल्या युवकांना घेवून सानपाडामधील मंडळाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. मंडळाचे सचिव रवीकुमार पाटणकर यांची भेट घेवून तरुणांना फसविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नोकरीसाठी पैसे घेतलेला एजंट एम. जी. मिश्रा हा स्वत: बोर्डात सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. याप्रकरणी मंडळाने संबंधित एजंट व त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंकाही व्यक्त होत आहे. आधी २५ मुलांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले होते. आता ही संख्या ३७ वर गेली आहे.
याप्रकरणी तत्काळ योग्य पावले उचलली नाहीत तर शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मिलिंद सूर्याराव, प्रकाश पाटील, घनश्याम पाटे, प्रकाश चिकणे, विसाजी लोके, संदेश चव्हाण, सुनील गव्हाणे, आशिष वास्कर आदी उपस्थित होते.