सीवूड्सच्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 02:17 IST2016-03-12T02:17:23+5:302016-03-12T02:17:23+5:30
गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या सीवुड्स रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सीवूड्सच्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण
प्राची सोनवणे , नवी मुंबई
गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या सीवुड्स रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी नवीन रेल्वे स्थानकाचा शुभारंभ करण्यात आला असून, पनवेल ते सीएसटी आणि सीएसटी ते पनवेल मार्गावरील दोनही फलाट सुरू करण्यात आले आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मात्र सीएसटीकडे जाणाऱ्या फलाटावर पोहोचण्यासाठी वळसा घालून यावा लागत असून, येथील भुयारी मार्गाचे काम अद्यापही रखडलेले असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या तिकीट खिडकीपासून फलाटावर येण्यासाठी असलेल्या भुयारी मार्गाचे काम रखडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून फलाटावर यावे लागत असल्याची माहिती नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून, लवकरात लवकर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्यदेखील वेळोवेळी उचलले जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. २ फलाट सुरू झाले. पूर्वीचे दोन फलाट वापरात नसल्याने त्या ठिकाणाहून एखादा पर्यायी मार्ग उपलब्ध करता येऊ शकतो. यामुळे अपंग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांना फलाटावर पोहोचण्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागणार नाहीत. अपंगांसाठी या नवीन रेल्वे स्थानकातही काहीच सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. या ठिकाणी रॅम्प नसल्याने अपंग प्रवाशांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारातून मार्ग शोधत बाहेर पडावे लागत असल्याने या ठिकाणी दिवे लावण्यात यावेत, अशी मागणीही रेल्वे प्रवासी संघटनेने केली असून सीवुड्स स्थानकाच्या पूर्वेकडील खिडकी संध्याकाळच्या वेळी देखील सुरू करण्यात यावी, याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे.