जागा वाटपाचे घोडे अडले
By Admin | Updated: April 5, 2015 01:08 IST2015-04-05T01:08:50+5:302015-04-05T01:08:50+5:30
महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.
जागा वाटपाचे घोडे अडले
नवी मुंबई : महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. गुरुवारच्या चर्चेत ६५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपाने नमते घेऊन शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेप्रसंगी ५० जागांची गळ शिवसेनेस घातली. मात्र, भाजपाने तब्बल १५ जागांची माघार घेऊनही शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी ठरावीक जागा सोडायला तयार नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. तर शनिवारी रात्री पुन्हा चर्चेची फेरी होणार असून त्यात एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही चर्चेला खेळीमेळीच्या वातावरण सुरुवात केली आहे. गुरुवारी दिलेला ६५ जागांचा प्रस्ताव मागे घेऊन नव्याने ५० जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, तरीही शिवसेना त्यास मानायला तयार नाही. परंतु, मी अन् माझे कुटुंब हे त्या पक्षातील काही नेत्यांचे धोरण युतीच्या चर्चेला मारक असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारची चर्चा रात्री उशिरा अडीच वाजेपर्यंत चालली. परंतु, प्रत्येक बाबतीत भाजपाने का म्हणून माघार घ्यावी. उलट नवी मुंबईत भाजपाचा एक आमदार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त प्रभागात आघाडीवर होतो. याची जाणीव त्या पक्षाने लक्षात घ्यायला हवी, असा भाजपाचा दावा आहे.
या संदर्भात युतीच्या नेत्यांशी संपर्क साधला असता, महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेना - भाजपाने दोघांनी एकेक पाऊल मागे यायला हवे. मात्र, आम्ही एक नव्हे तर दोन-तीन पावले घेतली आहेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं, हे शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे,असे भाजपा आमदार मंदा म्हात्रे लोकमतशी बोलताना म्हणाल्या. मात्र, युती होणारच, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तर शिवसेना नेते विजय नाहटा आणि विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.(खास प्रतिनिधी)
च्शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी वाशी सेक्टर - ९ मधील एका जागेसह ऐरोली आणि नेरूळमधील काही जागा सोडण्यास तयास नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
च्भाजपाला ऐरोलीपेक्षा बेलापूर मतदार संघात जास्त जागा हव्या आहेत. यात सुरुवातीला पक्षाने बेलापुरातून ३५ तर ऐरोलीतून ३० जागांची मागणी केली होती. ती कमी करून ते ५० जागांवर आले आहेत.