इनॉर्बिट मॉलमधील विनापरवाना स्टोअरला सील
By Admin | Updated: June 21, 2016 01:43 IST2016-06-21T01:43:30+5:302016-06-21T01:43:30+5:30
महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रविवारी रात्री वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू

इनॉर्बिट मॉलमधील विनापरवाना स्टोअरला सील
नवी मुंबई : महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रविवारी रात्री वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या हायपरसिटी या डिपार्टमेंटल स्टोअरला सील ठोकण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इनॉर्बिट मॉलबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तक्रारींची शहानिशा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. नगररचना आणि अतिक्रमण विभागाने केलेल्या पाहणीत मॉलमध्ये अनेक अनियमित बाबी आढळून आल्या. मोकळ्या मार्गिकेत दुकाने, पार्किंगचे अवास्तव दर, बेसमेंटचा पार्किंगऐवजी स्टोअरेज आणि इतर व्यावसायिक वापर आदी गोष्टींचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे या मॉलने २0१४ मध्ये बांधकाम परवानगी घेतली होती. परंतु त्याचा भोगवटा प्रमाणपत्र अद्यापि घेतले नसल्याचे आढळून आले. या सर्व पार्श्वभूमीवर या मॉलला महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयामार्फत १८ जून रोजी २४ तासांची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार रविवारी मॉलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
या कारवाईदरम्यान, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्यासह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुनील हजारे, सहाय्यक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)