नवरात्रीसाठी मूर्तिकार सज्ज
By Admin | Updated: October 12, 2015 04:31 IST2015-10-12T04:31:38+5:302015-10-12T04:31:38+5:30
नवरात्री उत्सवासाठी देवीच्या मूर्ती सज्ज झाल्या असून मूर्तिकारांकडून त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. अंबामाता, महिषासुरमर्दिनी, रेणुका, कोल्हापूरची देवी,

नवरात्रीसाठी मूर्तिकार सज्ज
भाग्यश्री प्रधान, ठाणे
नवरात्री उत्सवासाठी देवीच्या मूर्ती सज्ज झाल्या असून मूर्तिकारांकडून त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. अंबामाता, महिषासुरमर्दिनी, रेणुका, कोल्हापूरची देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, सप्तश्रृंगी, काळूआई, सिंहासनावर विराजमान असणारी देवी अशी या मूर्तिकारांनी देवीची विविध रूपे साकारली आहेत. या देवीच्या मूर्ती दीड फुटांपासून ते सहा फुटांपर्यंतच्या असून त्यांची किंमत १८०० रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत आहे.
मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी आतापर्यंत १० मूर्ती बनविल्या असून त्यातील ३० टक्के या घरगुती असून उरलेल्या सर्व या मंडळाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी साकारण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तींना साजशृंगार करावा लागत असल्याने त्या घडविण्यास अधिक वेळ लागतो.
साधारण एक मूर्ती घडविण्यासाठी २५ दिवस लागत असल्याचे त्यांनी सांगितले. देवीला रंग देताना मेटॅलिक, फ्लोरोसेंट, वेल्वेट रंगाचा वापर केला जातो. काही देवीच्या मूर्तीला खरी साडी नेसवली जाते. या साड्यांमध्ये हिरवा, लाल, पिवळा, केशरी असे रंग उपलब्ध असून मूर्तीच्या मापाप्रमाणे त्या शिवल्या जातात. काही मूर्तींना मंडळांच्या आवडीप्रमाणे साडीचे रंग दिले जातात. त्यानंतर मोती, हिरे अशा खऱ्या दागिन्यांचा साज देवीला चढविला जातो.
महेश कदम यांनी देवीच्या शाडूच्या मूर्ती तयार केल्या आहेत. त्या तीन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असून त्या दीड ते तीन फुटांपर्यंत उपलब्ध आहेत. त्या बनविण्यासाठी २० कारागीर काम करत असून या मूर्तींचे फिनिशिंग करणे अधिक परिश्रमाचे असल्याचे त्यांनी सांगितले.