अतिवृष्टीमुळे करंजे शाळेची भिंत कोसळली
By Admin | Updated: August 8, 2016 02:26 IST2016-08-08T02:26:05+5:302016-08-08T02:26:05+5:30
तालुक्यातील देवळे ग्रामपंचायतीतील करंजे शाळेच्या इमारतीची भिंत शनिवारी दुपारी कोसळली. मात्र सकाळी शाळा असल्याने दुपारी शाळेत कोणीही नव्हते

अतिवृष्टीमुळे करंजे शाळेची भिंत कोसळली
पोलादपूर : तालुक्यातील देवळे ग्रामपंचायतीतील करंजे शाळेच्या इमारतीची भिंत शनिवारी दुपारी कोसळली. मात्र सकाळी शाळा असल्याने दुपारी शाळेत कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.
शाळेची इमारत ही मोडकळीस आली होती. ही इमारत पाडून तीन वर्गखोल्यांची इमारत मंजूर करावी यासाठी जि.प. कडे शाळा व्यवस्थापन समितीचा पाठपुरावा चालू होता. मात्र जि.प.रायगडने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि केवळ एकच वर्गखोली मंजूर केली. मात्र स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने एक वर्गखोली बांधण्यास नकार दिला.
शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ४५ असून येथे तीन वर्गखोल्या मंजूर होणे गरजेचे आहे. शाळेची इमारत पडल्याची माहिती मिळताच सरपंच प्रकाश कदम यांनी पोलादपूर पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार यांच्या समवेत घटनास्थळी जावून शाळेची पाहणी केली. यावेळी माजी उपसभापती अनिता शिंदे, वरिष्ठ विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, ग्रामसेवक गावंड, अनिल दळवी, तुकाराम पवार, संतोष घाडगे, मुख्याध्यापक लवंगारे उपस्थित होते. सभापती कुंभार यांनी जि.प.कडे पाठपुरावा करून तातडीने जि.प.कडून तीन वर्गखोल्या मंजूर करू असे आश्वासन यावेळी दिले.
नेरळ : नेरळ -कळंब रस्त्यावरील धामोते शाळेजवळील जुने झाड शनिवारी दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु सुमारे दीड तास मोठी वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. नेरळ -कळंब रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. शनिवारी मार्गावर गुलमोहरचे जुने झाड कोसळले. यात वाहनांचे कोणतेही नुकसान झाले नाही. दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.