सिकंदर अनवारे/ लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोयना प्रकल्पातून निघालेली महापारेषणची ओव्हरहेड लाइन महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून गेली आहे. जंगल, डोंगर आणि रहिवासी भागातूनही लाइन गेली असून उंच झाडे आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे शॉर्टसर्किट होऊन स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी दुपारी महाड तालुक्यातील टोळ या गावाच्या परिसरात अचानक लाइन शॉर्टसर्किट होऊन दोन मोठे स्फोट झाले. स्फोट कशाचे सुरुवातीला नागरिकांना समजले नाही. मात्र तीव्रता एवढी होती की संपूर्ण परिसर हादरुन गेला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते.महाराष्ट्र शासनामार्फत वीज उत्पादन करणाऱ्या महापारेषण या निमखासगी कंपनीची ओव्हरहेड लाइन महाडच्या खाडीपट्ट्यातून गेली आहे. या लाइनमधून ४०० केव्ही इतका प्रचंड वीज प्रवाह वाहत असतो. डोंगर आणि जंगल भागासहित रहिवासी भागातून देखीलही लाइन टाकण्यात आली आहे. उंच टॉवरवर या तारा खेचण्यात आल्या असल्या तरी विजेचा दाब प्रचंड असल्याने तारेच्या संपर्कात कोणतीही प्रत्यक्ष वस्तू आली नाही तरी क्षेत्रात येणाऱ्या वस्तूमुळे देखील या ठिकाणी स्फोटाप्रमाणे आवाज आणि आगीचे लोट निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात हे प्रमाण जरी कमी असले तरी पावसाळ्यात मात्र वाढते. रिमझिम पाऊस अगर धुकेसदृश वातावरण असल्यास या लाइनखालून माणसांना अंगातून मुंग्या येणे अगर सौम्य शॉक लागण्यासारखे त्रास होत आहेत.शनिवारी दुपारी महाड तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील टोळगाव येथे रहिवासी भागालगत असलेल्या डोंगर भागात स्फोट आणि आगीचे लोट दिसून आले. प्रचंड मोठा आवाज झालेल्या या शॉर्टसर्किट स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट कशामुळे झाला? काही काळ ग्रामस्थांना कळू शकले नाही. आगीचे लोट निघाल्यानंतर टोळ ग्रामस्थांनी महापारेषणच्या नागोठणे येथील कार्यालयामध्ये तक्रार नोंदविल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषणचे संदीप चौधरी यांनी त्या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. कोणतीही धोकादायक परिस्थिती नसल्याचा निर्वाळा टोळ ग्रामस्थांना दिला. तांत्रिकदृष्ट्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार धोकादायक परिस्थिती नसली तरी ४०० के व्हीच्या या लाइनमुळे होणारे स्फोट आणि आगीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.ही लाइन ४०० के व्हीची आहे. या लाइनच्या इन्डक्शन रेंजमध्ये जर एखादे झाड अगर फांदी आली तर अशा प्रकारे ब्लास्ट होऊन आवाज होतो. ही मोठी घटना नाही, तर सर्वसाधारण घटना आहे. घटना घडली तर मायक्रो सेकंदामध्ये लाइन ट्रीप होते. ४०० क ेव्ही ही नागोठणे दाभोळ लाइन १ व २ (एक व दोन ) या महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या अति उच्चता वाहिन्या आहेत. खाली उंच झाडे असणे हे जीवित व वित्तहानीला कारणीभूत होऊ शकते, हे होऊ नये यासाठी ४०० के व्ही लाइन उपविभाग नागेठणे तर्फे वेळोवेळी लाइनच्या खालच्या झाडांची तोड करण्यात येते. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- संदीप चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नागोठणे रहिवासी भागातून टाकली लाइन१टोळ येथील ग्रामस्थ निजाम जलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०० के व्हीची ही लाइन टोळ गावापासून डोंगर भागातून पुढे नांदवी मार्गे जाणार होती, मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे गाव वाचवण्याचा आरोप जलाल यांनी केला आहे. २ही लाइन टाकताना शेतकऱ्यांची जमीन बळकावली. शेतजमीन अगर जंगली जमिनीचा मोबदला दिला नाही यामुळे टोळ भागात रहिवासी भागाबरोबरच येथील रहिवाशांच्या शेतीवर आधारित उत्पन्नाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. ३या लाइनसाठी ज्या ज्या ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना जमीन मोबदला मिळावा आणि रहिवासी भागातील धोका कमी करावा अशी मागणी निजाम जलाल यांनी केली आहे. येथील ग्रामस्थ देखील सुरुवातीपासून या मागणीसाठी पाठपुरावा शासन दरबारी करीत आहेत.
ओव्हरहेड लाइनवरील स्फोटाने नागरिक भयभीत
By admin | Updated: May 29, 2017 06:34 IST