खारफुटीला लावली आग
By Admin | Updated: February 29, 2016 02:15 IST2016-02-29T02:15:27+5:302016-02-29T02:15:27+5:30
पनवेलमधील विमानतळ परिसरात जंगलास आग लावून खारफुटी नष्ट केली जात आहे. चार ते पाच एकर परिसरातील जंगल नष्ट केले असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली

खारफुटीला लावली आग
नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेलमधील विमानतळ परिसरात जंगलास आग लावून खारफुटी नष्ट केली जात आहे. चार ते पाच एकर परिसरातील जंगल नष्ट केले असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
खारफुटीचे जंगल हे खाडी किनारी वसलेल्या शहरांची कवचकुंडले म्हणून ओळखली जातात. त्सुनामी व इतर वादळांच्या दरम्यान समुद्राचे पाणी शहरात जाण्यापासून रक्षण केले जाते. याशिवाय वातावरणातील कार्बन वेगळा करण्याचेही महत्त्वाचे काम केले जाते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ४७६७ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. त्यापासून प्रतिवर्षी जवळपास ३ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये पर्यावरणप्रेमींच्या दक्षतेमुळे खारफुटीचे रक्षण केले जात आहे. परंतु पनवेल परिसरात विकासाच्या नावाखाली खारफुटी नष्ट केली जात आहे. सिडकोच्या प्रस्तावित विमानतळासाठी तब्बल ६१५ हेक्टर जमिनीवरील ( त्यामधील २५० हेक्टर दाट जंगल) खारफुटी हटविली जाणार आहे. पर्यावरण विभागाने येथील वृक्षांची इतर ठिकाणी लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिडकोनेही वाघीवली बेटावर २४५ हेक्टर जमिनीवर व कामोठेमध्ये ३१० हेक्टर जमिनीवर मँग्रोज पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र विमानतळ परिसरातील जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. खारफुटीला आग लावली जात आहे. आगीमध्ये अर्धवट जळालेले वृक्ष तोडून नेले जात आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे वनविभाग व सिडको प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.
विमानतळ परिसरातील चिंचपाडा गावच्या हद्दीत १५ दिवसामध्ये खारफुटीची कत्तल सुरू झाली आहे. सर्वप्रथम जंगलास आग लावून वृक्ष सुकवले जात आहेत. सुकलेले वृक्ष तोडून मैदान तयार केले जात आहे. दोन आठवड्यात जवळपास ५ ते ६ एकर जमिनीवरील खारफुटी नष्ट केली आहे. पर्यावरणाचा सुरू असलेला ऱ्हास रोखण्यासाठी सिडको व वनविभागाचे कर्मचारी काहीच उपाययोजना करत नाहीत. पनवेल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी डेब्रिज टाकून तर काही ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे. मोठ्या प्रमाणातील जंगल विमानतळासाठी व उरलेले विकासाच्या नावाखाली नष्ट केले जात आहेत. यामुळे भविष्यात त्सुनामीसारखी वादळे आल्यास पूर्ण पनवेल तालुका पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय जंगलच राहिले नाही तर प्रदूषण थांबवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विमानतळाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. चिंचपाडा परिसरातील खारफुटी जाळून नष्ट केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. सिडको, वनविभाग व इतर विभागांमधील कोणाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.
- सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष
सेव्ह मँग्रोज अँड नवी मुंबई एक्झिस्टंस