सावित्री दुर्घटनेचा मच्छी व्यवसायावर परिणाम
By Admin | Updated: August 17, 2016 03:12 IST2016-08-17T03:12:39+5:302016-08-17T03:12:39+5:30
सावित्री पूल दुर्घटनेमध्ये ४१ बेपत्ता प्रवाशांपैकी केवळ २८ जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले तर अद्याप १३ प्रवाशांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत.

सावित्री दुर्घटनेचा मच्छी व्यवसायावर परिणाम
दासगाव : सावित्री पूल दुर्घटनेमध्ये ४१ बेपत्ता प्रवाशांपैकी केवळ २८ जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले तर अद्याप १३ प्रवाशांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. सापडलेले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते. याचा धसका मासे खाणाऱ्यांनी घेतला. मासे खाण्यातून अपाय होईल या भीतीने मच्छी
विक्रेत्यांच्या दुकानांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
सावित्री नदीमध्ये महाड आणि खाडीपट्टा भागात मासेमारी केली जाते. आदिवासी तसेच या परिसरातील मासेमारी करणारे लोक मासेमारी करून महाड तसेच विविध गावांत मासे
विक्रीला आणतात. मात्र गेल्या आठवडाभरापासून या मासे
विक्रेत्यांकडे मासे खवय्यांनी पाठ फिरविली आहे. सावित्री खाडी तसेच नदीमध्ये बेपत्ता व्यक्तींपैकी अनेकांचे मृतदेह सापडले होते. अनेक लोकांनी हे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहिले आहेत. महिला वर्गाने याचा चांगलाच धसका घेतला आहे. मासे आणण्यास महिला नकार देत असल्याचे एका मासे खवय्याने सांगितले.
बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सावित्री खाडी तसेच महाडजवळ नदीत सापडले होते. या कुजलेल्या मृतदेहांना दुर्गंधी पसरली होती. यामुळे मनात शंका निर्माण होत असल्याने अनेकजण मासे खाण्यापासून लांब झाले आहेत. दासगाव, महाड, बिरवाडी, नाते आदी परिसरात सावित्री नदीच्या गोड्या पाण्यातील मासे आवर्जून खाले जातात. या घटनेनंतर मात्र मासे विक्रेत्यांकडे शुकशुकाट दिसत आहे. यामुळे मासे विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)