नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कामगार दिन असूनही मुंबईकरांना भाजीपाला वेळेत पोहचविता यावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितिचे भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. मार्केटमध्ये आवक समाधानकारक झाली परंतु सलग सुट्या असल्यामुळे विक्री मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. १५ ते २० टक्के मालाची विक्री झाली नाही. गत आठवड्याच्या तुलनेमध्ये फरसबी, शेवगा, आवळ्याचे दर तेजीत असून वाटाणा व कोथिंबीरचे दर घसरले आहेत.
बाजार समितीमध्ये सोमवारी २९१ ट्रक व २६० टेम्पो अशा ६०० वाहनांमधून २८९६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला. यामध्ये ४ लाख ४ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. नाशिक, पुणे, सातारा, नगर व राज्याच्या विविध भागातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. गुजरात व दक्षीणेसह उत्तरेकडील राज्यांमधूनही कृषी मालाची आवक सुरू आहे. कोथिंबीरच्या १ लाख ५८ हजार जुडीची आवक झाली आहे. गत आठवड्यात १५ ते ३० रुपये जुडी दराने विकली जाणारी कोथिंबीर सोमवारी १० त २० रुपयांनी विकली जात होती. पालकची आवकही वाढली आहे. गत आठवड्यात वाटाणा ५० ते ७५ रुपये किलो दराने विकला जात होता. त्याचे दर ५० ते ६५ रुपये झाले आहेत.
आवळा ३४ ते ४४ वरून ३८ ते ४६ रुपये किलो, फरसबी ३० ते ५० वरून ५५ ते ७५ रुपये, दुधी १८ ते २२ वरून २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे चाकरमानी गावी जात असल्यामुळे ग्राहक काही प्रमाणात कमी आहे. बाजारभावामध्येही चढ- उतार होत आहेत. मे महिन्यामध्येही मागणी थोडी कमीच राहील असेही त्यांनी सांगितले.
एपीएमसीमधील भाजीपाल्याचे प्रतीकिलो बाजारभाव वस्तू - २४ एप्रिल - १ मे
- आवळा - ३४ ते ४४ - ३८ ते ४६
 - भेंडी - २५ ते ४० - २५ ते ३२
 - दुधी भोपळा - १८ ते २२ - २० ते ३०
 - फरसबी - ३० ते ५० - ५५ ते ७५
 - फ्लॉवर - १० ते १६ - १० ते १२
 - गाजर - २० ते २६ - २५ ते ३०
 - कोबी ७ ते ९ - ७ ते १२
 - शेवगा शेंग - १८ ते २६ - २४ ते ३०
 - वाटाणा ५० ते ७५ - ५० ते ६५
 - कोथिंबीर - १५ ते ३० - १० ते २०