हनुमान नगरमध्ये अमली पदार्थांची विक्री, पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:18 AM2017-11-25T02:18:26+5:302017-11-25T02:18:40+5:30

नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमान नगरमध्ये गांजासह चरसची खुलेआम विक्री सुरू झाली आहे.

Sale of drugs in Hanuman Nagar, neglect of police action | हनुमान नगरमध्ये अमली पदार्थांची विक्री, पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

हनुमान नगरमध्ये अमली पदार्थांची विक्री, पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमान नगरमध्ये गांजासह चरसची खुलेआम विक्री सुरू झाली आहे. झोपडपट्टीच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या अड्ड्याविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तरुणांना व्यसनांच्या जाळ्यात ढकलले जात असून, खुलेआम सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई केली जात नसल्याने पोलिसांविषयीही नाराजी वाढू लागली आहे.
नवी मुंबईमधील बंद पडलेले अमली पदार्थांचे अड्डे पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. ‘लोकमत’च्या टिमला मिळालेल्या माहितीप्रमाणे एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील हरिभाऊ विधाते उर्फ टारझनचा अड्डा एक आठवड्यापासून सुरू झाला आहे. शिवाजी नगरमध्ये गांजाविक्री कधीच बंद झालेली नाही. नेरुळमधील बालाजी टेकडीच्या पायथ्याला दोन ठिकाणी गांजाविक्री होत आहे. तुर्भे नाक्यावरील हनुमान नगरमधील अड्डाही पुन्हा सुरू झाला आहे. येथील शफिक किराणा स्टोअर्सच्या समोरील मोकळ्या जागेवर एकाच परिवारातील जवळपास तीन महिला गांजा व चरसची विक्री करत आहेत. नागरिकांच्या मदतीने अनेक दिवसांपासून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून अमली पदार्थांची विक्री करत असतानाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रीकरणामध्ये महिला गांजासह छोट्या पुडीमध्ये चरसही विक्री करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अमली पदार्थांची विक्री सुरू असलेल्या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. किराणा दुकानामध्ये नागरिक साहित्य घेण्यासाठी येत असतात. त्यांच्यासमोरच अमली पदार्थांची विक्री सुरू असते. नागरिकांनी येथे व्यवसाय करू नका, असे सांगितले तर त्यांनाच धमकी दिली जात आहे. विक्री करणाºयांना पोलिसांची भीती उरलेली नाही. ‘पोलिसांना आम्ही हप्ते देतो, ते आमच्यावर काहीही कारवाई करू शकत नाहीत,’ असे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांनाही गप्प बसावे लागत आहे.
हनुमान नगरमधील अवैध व्यवसायाचे १५ दिवसांमध्ये जवळपास पाच वेळा मोबाइलने चित्रीकरण केले आहे. सर्व चित्रीकरण ‘लोकमत’कडे आहे. गांजा व चरसची विक्री सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, यापूर्वी येथील एका महिलेवर गुन्हा दाखल केला होता. काही दिवस अड्डा बंद झाला; पण आता तिच्या परिवारातील इतर महिलांनी तो पुन्हा सुरू केला आहे.
पोलिसांना याविषयी सर्व माहिती आहे; पण पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. पोलीस दुर्लक्ष करत असल्याने आम्ही कोणाकडे तक्रार करायची? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे उत्तर राजकीय पदाधिकारीही देत आहेत. परिसरातील अवैध व्यवसाय थांबावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याने आता अमली पदार्थविक्रीचे व्हिडीओ तयार करून मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांना पाठविण्यात येणार असल्याचेही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
>कायदा हातात घ्यायचा का?
हनुमान नगरमध्ये यापूर्वीही गांजा विक्री करणाºया महिलेविरोधात नागरिकांनी आंदोलन केले होते. एक महिलेला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते; पण काही दिवसांत पुन्हा अमली पदार्थांची विक्री सुरू झाली. काही दिवसांपासून हा व्यवसाय तेजीत आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून अशीच स्थिती राहिली तर नागरिकच कायदा हातात घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>मुख्यमंत्र्यांना पाठविणार सीडी : अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी गांजाविक्रीचे व्हिडीओ तयार केले आहेत. खुलेआम अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांनाही चित्रीकरणाची सीडी पाठविणार आहे.
>रहिवाशांमध्ये भीती : हनुमान नगरमधील शफिक किराणा स्टोअर्सला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर महिला गांजा व चरसविक्री करत असतात. किराणा दुकानदारही त्यांना तेथून हाकलत नाहीत. नागरिकांनी महिलेला येथे अवैध व्यवसाय करू नका, असे सांगितले; पण कोणीही ऐकत नाही. पोलिसांना आम्ही हप्ते देतो, असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Sale of drugs in Hanuman Nagar, neglect of police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.