नवी मुंबई : हजेरीपत्रकावर अनुपस्थिती असल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील १८डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी खुलासा सादर केला असून त्यातील १७ जणांचा खुलासा आयुक्त अभिजित बांगर यांनी अमान्य केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर वेतनकपातीची कारवाई केली. आहे.पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना आयुक्त अभिजित बांगर यांना वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेत बांगर यांनी १८ ऑनकॉल मेडिकल ऑफिसर तसेच या बाबीकडे लक्ष देण्याची जबाबदारी असलेले वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्य विभागाच्या कामकाजावर नियंत्रण असणारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधितांनी सादर केलेला खुलासा आयुक्त बांगर यांनी अमान्य केला असून १७ ऑनकॉल मेडिकल ऑफिसर्सची वेतनकपात करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सादर केलेला खुलासाही आयुक्तांनी अमान्य केला. विभागप्रमुख म्हणून रुग्णालयास वेळोवेळी भेट देऊन रुग्णालय स्तरावर नियोजन करत खातरजमा करण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवामधील नियम १0 अन्वये कारवाई का करण्यात येऊ नये, अशी अंतिम नोटीस दिलेली आहे. ऑनकॉल मेडिकल ऑफिसरने हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे व ते तपासण्याची जबाबदारी रुग्णालयप्रमुख म्हणून वैद्यकीय अधीक्षकांची असल्याचे नमूद करीत वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचाही खुलासा अमान्य करण्यात आला आहे. त्यांनासुद्धा अंतिम नोटीस बजावली.
कर्तव्यात कसूर नकोचदरम्यान, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील डॉक्टरांपासून ते वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी कटिबद्ध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांची किंवा इतर कर्मचाऱ्यांची विनापरवानगी अनुपस्थिती अथवा कर्तव्यात कसूर दिसून आली तर ती शिक्षेस पात्र राहील याची दखल सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.