परवाना वाटप सुरू झाल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:36 IST2015-12-29T00:36:45+5:302015-12-29T00:36:45+5:30
रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन वाटप सुरू झाले असल्याची अफवा शहरात पसरविली जात आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रम निमाण झाला असून, वारंवार आरटीओ कार्यालयात विचारणा केली

परवाना वाटप सुरू झाल्याची अफवा
नवी मुंबई : रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन वाटप सुरू झाले असल्याची अफवा शहरात पसरविली जात आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रम निमाण झाला असून, वारंवार आरटीओ कार्यालयात विचारणा केली जात आहे. परंतु या अफवा असून अद्याप शासनाने परवाना वाटप सुरू केले नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.
शासनाने रिक्षा परवान्यांची लॉटरी काढली आहे. परवान्यांसाठी अर्ज मागविण्यात आले असल्याची अफवा काही समाजकंटकांनी शहरात पसरविली आहे.
सद्य:स्थितीमध्ये हजारो चालकांकडे परवाना नसल्याने अनेकांनी आरटीओ कार्यालयात जाऊन व फोन करूनही विचारणा सुरू केली आहे.
शहरभर याचीच चर्चा सुरू असल्यामुळे चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी सर्वांना आवाहन केले आहे, की शासनाने अद्याप याविषयी कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. परंतु त्यानंतरही नागरिकांकडून याविषयी विचारणा होऊ लागली आहे. आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली नाही. शासनाने अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. फक्त टेस्ट साइट चालू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अर्ज घेणे सुरू झालेले नाही. शहरवासीयांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रिक्षा परमिटचे वितरण कधी होणार, हे शासनाकडून जाहीर केले जाईल. याविषयी वर्तमानपत्रांमध्ये रीतसर जाहिरात दिली जाते. अर्ज देण्यासाठी, घेण्यासाठी व इतर सर्व प्रक्रियेची माहिती दिली जाते. यामुळे सद्य:स्थितीमध्ये कोणीही तोंडी चुकीची माहिती दिली तर त्यावर विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे. (प्रतिनिधी)