बँक बुडाल्याची अफवा
By Admin | Updated: October 14, 2015 02:55 IST2015-10-14T02:55:57+5:302015-10-14T02:55:57+5:30
बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेने तब्बल ६,१७२ कोटी रुपये बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हाँगकाँगला पाठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर

बँक बुडाल्याची अफवा
कर्जत: बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेने तब्बल ६,१७२ कोटी रुपये बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हाँगकाँगला पाठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या शाखेचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी सीबीआयच्या विविध पथकांनी शनिवारी बँकेच्या दिल्लीतील काही शाखांची कसून झडती घेतली होती. पाच वर्षांपूर्वी पेण अर्बन बँक बंद झाल्याने अनेकांचे पैसे अडकले आहेत. याचा धसका घेतल्याने ेखातेदारांनी पैसे काढण्यासाठी नेरळ येथील शाखेत प्रचंड गर्दी केली होती.
बातमी सर्वत्र पसरल्यानंतर नेरळच्या बँक आॅफ बडोदाच्या शाखेत या घटनेचे पडसाद उमटले. ही बँक बंद होणार, अशी भीती खातेदारांमध्ये निर्माण झाली. मात्र दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेचा इतर कोणत्याही शाखेतील खातेदाराला त्याचा त्रास होणार नसून, पैसे आमच्या बँकेत सुरक्षित जमा आहेत. ही बँक बुडणार नाही, असा विश्वास यावेळी नेरळ शाखेच्या व्यवस्थापकांंनी खातेदारांना दिला. मंगळवारी सकाळी बँकेची इंटरनेट सेवा काही काळापुरती बंद झाली होती. त्यावेळी बँकेने आपले आर्थिक व्यवहार हे थांबवले होते. तेव्हा बँकेत उपस्थित असलेल्या खातेदारांमध्ये बँक बंद होणार याची आणखी भीती निर्माण झाली. काही वेळाने मात्र इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर बँकेचे व्यवहार पूर्ववत झाले.
बँक बुडण्याची ही अफवा आहे. खातेदारांनी यावर विश्वास ठेवू नये. खातेदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढायची असल्यास माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन व्यवस्थापकांनी केले आहे. (वार्ताहर)