सोनोग्राफी सेंटर्सचे नियम मुंबई, पुण्यात धाब्यावर
By Admin | Updated: March 18, 2015 01:57 IST2015-03-18T01:57:45+5:302015-03-18T01:57:45+5:30
बेटी बचाव, बेटी बढाओ’ ही मोहीम एकीकडे राबविली जात असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूणहत्येबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे.

सोनोग्राफी सेंटर्सचे नियम मुंबई, पुण्यात धाब्यावर
मुंबई : ‘बेटी बचाव, बेटी बढाओ’ ही मोहीम एकीकडे राबविली जात असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूणहत्येबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे. मुंबई आणि पुण्यातील सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लघंन होत असल्याचे गंभीर निरीक्षण नॅशनल इन्स्पेक्शन एण्ड मॉनिटरिंग कमिटीने (एनआयएमसी) नोंदवले आहे.
गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्यानुसार, गर्भ चाचणी करताना काही आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पूर्तता करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांवर पात्रता असलेला डॉक्टरच सही करू शकतो. पण प्रत्यक्षात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. एनआयएमसीच्या चमूने १२ आणि १३ मार्चला मुंबई आणि पुण्यातील सोनोग्राफी सेंटर्सना भेटी दिल्या. अॅड. वर्षा देशपांडे आणि डॉ. वंदना वाळवेकर यांनी मुंबईतील ३ आणि पुण्यातील ४ सेंटर्सना भेटी दिल्या. मुंबईच्या बॉम्बे, नायर आणि मिडटाऊन इमर्जिंग सेंटर यांना भेटी दिल्या. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार येथील मशिन सिल करण्यात आल्याचे अॅड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले.
राज्यात समितीच गायब
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार, राज्यात सल्लागार समिती नेमली गेली पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे. पण गेल्या ४ वर्षांत राज्यात समिती स्थापन करण्यात आलेली नाही.