सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:46 IST2016-03-01T02:46:29+5:302016-03-01T02:46:29+5:30
शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांशी संबंधित प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. विशेष म्हणजे विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून

सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
अलिबाग : शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांशी संबंधित प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. विशेष म्हणजे विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्ताधारी पक्षातील शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सदस्यांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट चित्र शिवतीर्थावर दिसून आले.
रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. विरोधक असणाऱ्या शिवसेनेने असंतुष्ट सदस्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे मनसुबे आखले आहेत. जिल्हा परिषदेमधील असणाऱ्या सभापतीपदी आणि अध्यक्ष-उपाध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी, यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्य आक्रमक झाले आहेत. अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद श्यामकांत भोकरे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारच्या बैठकीत सज्जड दम दिला होता. तसेच अध्यक्षपदी वर्णी लावण्याबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचे तटकरे यांनी भोकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे नाराजीच्या सुरात असलेले श्यामकांत भोकरे आजच्या बैठकीत आपल्याच सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी मागील बैठकीत दिलेल्या आश्वासनाची कोणती पूर्तता करण्यात आली, जिल्ह्यातील विश्रामगृहे महिला बचत गटांना चालविण्यासाठी देण्याच्या योजनेचे काय झाले, असे प्रश्न करीत त्यांनी सुरुवातीलाच तोफ डागली. त्यानंतर शिवसेनेनेही पेटलेल्या वातावरणाचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांवर चौफेर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांना शेकापचे एकनाथ देशेकर यांनी साथ दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांसह स्वकीयही आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण, पाणीपुरवठा या प्रश्नांचे चारही बाजूंनी होणारे हल्ले परतावून लावताना सत्ताधारी आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.
रायगडावर शिवाजी महाराजांना सलामी देण्याचे तसेच गडावर नगारे वाजविणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत ठोस कारवाई का झाली नाही, असा प्रश्न शिवसेनेचे सूर्यकांत कालगुडे यांनी विचारला. त्यावेळी कार्यवाही सुरू असल्याचे मोघम उत्तर प्रशासानाने दिल्याने कालगुडे संतप्त झाले. खासदारही तुमच्याच पक्षाचे असल्याने त्यांच्याकडून काम करून घ्या, असे उत्तर शेकापचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिल्याने कालगुडे प्रचंड खवळले. हे काम जिल्हा परिषदेचे असल्याने तुम्हीच केले पाहिजे, असे महेंद्र दळवी यांनी खडसावले. शिवाजी महाराजांच्या विषय असल्याने भोकरे यांनीही त्यामध्ये उडी घेत विरोधकांना चांगलेच बळ दिले. याप्रसंगी बांधकाम सभापती चित्रा पाटील, गीता जाधव आदींसह अधिकारी उपस्थित होते.पाणीपट्टी रद्द करा : पेण तालुक्यात खारेपाटातील ४४ गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या गावांतून घेण्यात येणारी पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर ठराव घेऊन सरकारला कळविण्यात येईल, असे सभागृहाने सांगितले. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी रस्ते आणि पाण्यासाठी ४० कोटी रुपये आणले होते. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या शेकापने ते रोखल्याचे सदस्या कौसल्या पाटील यांनी सांगितले. त्यावर नीलिमा पाटील आक्रमक झाल्या. १० पैशाचाही निधी आला नसून, मागील फायली सभागृहाने तपासाव्यात, असे आव्हान पाटील यांनी दिले.हिश्शाचा फंड विकासासाठी खर्च करावा : पनवेल आणि उरण तालुक्यांतील काही गावांचा समावेश हा सिडकोमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्या गावांना जिल्हा परिषदेमधील फंड न देता त्या गावांच्या हिश्शाचा फंड अन्य गावांच्या विकासासाठी खर्च करावा. यासाठी ठराव घ्यावा, अशी मागणी सदस्य राजेंद्र पाटील यांनी केली. पेण-जोहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी द्यावी, त्याचप्रमाणे रोहे-रोठे येथे गेली १३ वर्षे ग्रामसेवक पदावर असलेले दीपक चिपळूणकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ग्रामसेवकांना पुरस्कार देताना त्याचे चारित्र्य पडतळून पाहा, अशा मागण्या करण्यात आल्या.