आर.टी.ई. प्रतीक्षा यादीबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था; शैक्षणिक नुकसानीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:10 AM2020-10-16T00:10:06+5:302020-10-16T00:10:19+5:30

निम्मे शैक्षणिक वर्ष संपल्याने लवकर निर्णय घेण्याची मागणी

R.T.E. Confusion among parents about the waiting list; Fear of academic loss | आर.टी.ई. प्रतीक्षा यादीबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था; शैक्षणिक नुकसानीची भीती

आर.टी.ई. प्रतीक्षा यादीबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था; शैक्षणिक नुकसानीची भीती

Next

नवी मुंबई : कोरोना संकटामुळे या वर्षी आर.टी.ई. अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या  प्रवेशाबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

आर.टी.ई. अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची ऑनलाइन सोडत १७ मार्चला जाहीर करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता. लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती. शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. 

आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. पुण्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी निवड यादीतील विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबत कार्यवाही करण्याची प्राथमिक जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविली आहे. परंतु यादीमध्ये निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या वेळेत प्रवेश  निश्चित केलेले नसल्याने प्रवेशासाठी तीन वेळा मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाहीत.  प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही पालकांनी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत; परंतु प्रतीक्षा यादीमधील अनेक पालक अद्याप प्रतीक्षा करीत असून, निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आल्याने पालकांच्या चिंतेत  आणखी वाढ झाली आहे.

प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शासनाने २५ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. शाळांकडून सदर प्रक्रिया राबविली जात असून, सिरीयल प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जात आहेत. प्रवेश निश्चित होणाऱ्या पालकांना याबाबत मेसेज प्राप्त होत आहेत. - योगेश कडुसकर, उपायुक्त, शिक्षण विभाग, न.मुं.म.पा.

Web Title: R.T.E. Confusion among parents about the waiting list; Fear of academic loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.