महामार्गावरील लुटारूंना अटक
By Admin | Updated: February 6, 2015 23:06 IST2015-02-06T23:06:58+5:302015-02-06T23:06:58+5:30
पश्चिम महामार्गावर कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून मागोवा काढत मुंबईतील विविध ठिकाणांहून अटक केली आहे.

महामार्गावरील लुटारूंना अटक
भार्इंदर : पश्चिम महामार्गावर कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून मागोवा काढत मुंबईतील विविध ठिकाणांहून अटक केली आहे.
महामार्गावर अनेक प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटण्याच्या घटना काशिमीरा पोलिसांच्या हद्दीत घडल्या असल्या तरी अनेक प्रवाशांच्या हत्येचे प्रकारही घडले आहेत. हे लुटारू गरजू प्रवाशांना हेरून त्यांना लिफ्ट देतात. पुढे एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी त्यांना लुटून सोडून दिले जाते. लुटारूंना विरोध केल्यास प्रसंगी त्या प्रवाशाची हत्या करून अथवा त्याला जबर जखमी केले जाते. असाच प्रकार काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. घोडबंदर रोडवरील काजूपाडामध्ये दत्त मंदिराजवळील शिवशक्ती सोसायटीतील रूम नं. ए/३ मध्ये राहणाऱ्या राजेश नारायण मिश्रा (३३) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास काशिमीरा परिसरातून काजूपाडा येथील घरी जाण्यासाठी एक खाजगी कार थांबविली. त्यात चालकासह दोन प्रवासी अगोदरच बसले होते. मिश्रा यांना कारमध्ये बसविण्यात आले. कार निघाल्यानंतर ती वर्सावे परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी थांबविण्यात आली. त्यातील चालकासह त्या दोन प्रवाशांनी मिश्रा यांच्याकडील साडेसहा हजारांची रोकड लुटून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने इजा करून जखमी अवस्थेत तेथेच सोडून पोबारा केला. याप्रकरणी मिश्रा यांनी काशिमीरा पोलिसांत ५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी घटनेचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असता परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात घटनेच्या वेळी वापरण्यात आलेल्या कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेत त्यांना मुंबईच्या वडाळा व अॅन्टॉप हिल परिसरातून अटक केली आहे.
आरोपींमध्ये मेहताब अली शराफत अली खान (३०) रा. २८१, म्हाडा ट्रान्झिट कॅम्प, कोकणी आगार, ९० फुटी रोड, वडाळा टीटी, मुंबई, मोहम्मद इफ्तिखार मोहम्मद मुश्ताक खान (२९) रा. २, हिम्मतनगर, म्हाडा बि. क्र. ५ च्या बाजूला, मराठा चाळीजवळ, अॅन्टॉप हिल, मुंबई व जीवन दयाराम राजभर (३०) रा. संगमनगर, पाटील चाळीसमोर, वडाळा, मुंबई यांचा समावेश असून त्यांनी मुंबईसह इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कांबळे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)