अलिबागमध्ये चार महिन्यांत उखडले रस्ते

By Admin | Updated: July 14, 2016 02:11 IST2016-07-14T02:11:57+5:302016-07-14T02:11:57+5:30

‘निर्लज्जम् सदा सुखी’ अशी उपाधी देत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा अलिबाग आणि पोयनाड येथील मिनीडोर चालक-मालक कल्याणकारी संघटनेने उघड केला.

Road collapses in Alibaug for four months | अलिबागमध्ये चार महिन्यांत उखडले रस्ते

अलिबागमध्ये चार महिन्यांत उखडले रस्ते

अलिबाग : ‘निर्लज्जम् सदा सुखी’ अशी उपाधी देत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा अलिबाग आणि पोयनाड येथील मिनीडोर चालक-मालक कल्याणकारी संघटनेने उघड केला. तालुक्यात काहीच महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात उखडला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे होणारे हाल रोखण्यासाठी संघटनेने स्वनिधीतून रस्त्यांच्या दुरुस्तीला बुधवारी सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचा एकही अधिकारी तेथे फिरकला देखील नाही.
अलिबाग तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अलिबाग - रेवस, मांडवा हा मार्ग तर खड्यांच्या साम्राज्यांनी व्यापला आहे. तेथून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. यामार्गाचे फेब्रुवारी महिन्यात काम करण्यात आले होते. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. तेथून गरोदर महिला प्रवास करताना घाबरत होत्या. अशा खडतर मार्गावरून प्रवास करताना त्या मिनीडोरमधून खाली उतरत होत्या, असे संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या रस्त्याची आठ दिवसांत दुरुस्ती करावी, असे निवेदन मिनीडोर चालक-मालक कल्याणकारी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला ३० जूनला दिले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मिनीडोर चालकांनी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने स्वनिधीतून रस्त्याची दुरुस्ती करण्याला पसंती दिली. आरसीएफ कंपनीचे गेट ते सातिर्जे पुलापर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली.
दिलीप भोईर यांनी त्यांच्याकडील जेसीबी, ट्रक, कामगार अशी सर्व यंत्रणा तेथे कामाला लावली. येथील कामाला सकाळपासून सुरुवात करण्यात आली. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतक विस्कळीत झाली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.


बल्लाळेश्वर नगर येथील रस्ता जलमय
1पाली : शहरातील बल्लाळेश्वर नगर येथे पाली गावठाणमधील जागा संपल्यानंतर मोठी बिनशेती वसाहत निर्माण झाली आहे. बहुसंख्य पालीतील व पालीबाहेरील नोकरदारांनी येथे जागा घेऊन घरे बांधली आहेत. त्यामुळे पालीतील सर्वात जास्त नोकरदारवर्ग या नगरामध्ये २० ते २५ वर्षांपासून राहत आहे. मात्र अद्याप येथे ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने व येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.2 हे नगर पाली ग्रामपंचायत किंवा तथाकथित नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्यामुळे येथील नागरिक ग्रामपंचायतीचे सर्व कर अगदी नित्यनेमान भरत असतात. या प्रभागाने ग्रामपंचायतीला दोन सदस्य देखील दिले आहेत. असे असून देखील कित्येक वर्षे या भागातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रचंड पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रस्त सहन करावा लागत आहे. 3साचलेल्या पाण्यामुळे येथील परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच डासांचे प्रमाणी देखील वाढले आहे. सर्व कर वेळेवर भरून देखील मागील २०-२५ वर्षांपासून विकासापासून वंचित राहिल्यामुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट आहे. अनेक वेळा गाऱ्हाणे सांगूनही लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. येथील समस्येचा संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.

नेरळमधील रस्त्याची चाळण
नेरळ : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या नेरळ गावातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, नेरळ गावातील शासनाच्या सर्व यंत्रणांनी उभारलेल्या रस्त्यांची अवस्था बिकट असून, ग्रामस्थांनी खड्डेमय रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला जाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या गावातील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. नेरळ स्टेशन येथून सुरू होणारा माथेरान रस्ता जकात नाक्यापर्यंत म्हणजे नेरळ गावात पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यातील मुख्य बाजारपेठेत या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. महावीर चौक ते विद्या विकास शाळा हा रास्ता देखील खराब झाला आहे.मुंबई महानगर विकास प्राधिकरणने नेरळमधील सर्व रस्त्यांसाठी गेल्यावर्षी मंजूर केलेला २२ कोटींचा निधी दिला असता, तर आतापर्यंत रस्ते आरसीसी तयार झाले असते. मात्र त्याचवेळी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सर्वांना होऊ नये, म्हणून ग्रामपंचायत विटा-माती यांच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करीत आहे असे सरपंच सुवर्णा नाईक यांनी सांगितले.

Web Title: Road collapses in Alibaug for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.