रिक्षाचे परवाने दलालांच्या कचाट्यात
By Admin | Updated: July 17, 2017 01:30 IST2017-07-17T01:30:23+5:302017-07-17T01:30:23+5:30
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. परवाना, बॅच तसेच आवश्यक

रिक्षाचे परवाने दलालांच्या कचाट्यात
वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. परवाना, बॅच तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास हे रिक्षा परवाने मिळणार असल्याने अनेकांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या गर्दी केली आहे . मात्र या परवान्याच्या नावाखाली दलाल अर्जदारांकडून पैशाची मागणी करीत आहेत. ठरावीक रक्कम दिल्यास तुम्हाला रिक्षा परवाना मिळेल, अशी बतावणी करून सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर अर्जदारांची लूट सुरु आहे.
गतवर्षी शासनाच्या वतीने मर्यादित स्वरूपात परवाने देण्यात आले होते. मात्र यंदा रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खुल्या पद्धतीने परवाना वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर विविध प्रादेशिक कार्यालयात परवानासंदर्भात आवेदने स्वीकारली जात आहेत.
रिक्षा परमिट मिळविण्यासाठी अनेकांना या प्रक्रि येची माहिती नसते. त्यामुळे ते दलालांकडे जातात. मात्र दलाल त्याचा फायदा घेऊन ग्राहकाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहेत.
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात हा प्रकार सर्रास सुरु असून परमिटसाठी अर्ज करणारे दलालांच्या विळख्यात सापडले आहेत. लोकांमध्ये जागरूकता नसल्याने लोक दलालाकडे जात आहेत. याचाच फायदा दलाल घेत आहेत. याबाबत वाच्यता केल्यास परमिट मिळणार नाही, अशी भीती बाळगून अनेक जण तक्र ारीसाठी पुढे सरसावत नाहीत. विशेष म्हणजे या प्रक्रि येसाठी नेमके काय करावे याची ठळक माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर लावली नसल्याने अर्जदार संभ्रमात आहेत.