३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
By Admin | Updated: May 31, 2017 04:08 IST2017-05-31T04:08:52+5:302017-05-31T04:08:52+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी

३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१७दरम्यान झालेल्या या परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय बोर्डाने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका पसरविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी करण्यात आली असून, पुढील अडीच वर्षे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचा खुलासा मुंबई बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केला.
ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी अपात्र, १५ विद्यार्थी चौकशीकरिता राखीव, ९ विद्यार्थी आयसोलेटेड विषयांमुळे तर ३ विद्यार्थ्यांचे निकाल हे इतर त्रुटींमुळे राखीव ठेवण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवर बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार परीक्षाबंदी लागू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची यंदाची परीक्षा रद्द केली असून, यापुढील पाच परीक्षा देता येणार नसल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. २०२०मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने १७ कॉपी प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
विभागातील पुनर्परीक्षार्थी आणि विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीमुळे निकालाचा टक्का घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याची माहिती देताना परीक्षेच्या एक तास अगोदरही अर्ज स्वीकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. परीक्षेच्या दिवशी सकाळी १० वाजता अर्ज करून एका विद्यार्थ्याला वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे परीक्षेला बसविण्यात आले होते.