माथेरानच्या कार पार्किंगमध्ये रेस्टॉरंट !
By Admin | Updated: June 2, 2017 05:43 IST2017-06-02T05:43:39+5:302017-06-02T05:43:39+5:30
पर्यटकांनी गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. या माथेरानमध्ये पर्यटक आपल्या खासगी वाहनातून आले असता दस्तुरी

माथेरानच्या कार पार्किंगमध्ये रेस्टॉरंट !
अजय कदम/ लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : पर्यटकांनी गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. या माथेरानमध्ये पर्यटक आपल्या खासगी वाहनातून आले असता दस्तुरी येथील जागेत वन व्यवस्थापन समितीचे कार पार्किंग आहे. हे पार्किंग फुल्ल झाले असे सांगून कर्मचारी आपले हात वर करत आहेत. वास्तविक पाहता या पार्किंगमध्ये बेकायदा रेस्टॉरंट सुरू आहे, त्यामुळे येथे पर्यटकांचे हाल होत आहेत.
माथेरान हे मुंबई, पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पर्यटक पहिली पसंती देतात. आपले खासगी वाहन घेऊन पर्यटक माथेरानला आले असता प्रवेशद्वारातच वन व्यवस्थापन समितीचे कार पार्किंग आहे. येथे पर्यटकांकडून पार्किंगचे कर आकारले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पार्किंगमध्ये रेस्टॉरंट चालविले जात आहे. हे रेस्टॉरंट बस स्टॅण्डच्या बाजूलाच लावले जाते. त्यामुळे पार्किंगसाठी कमी जागा पडत असून येथे पर्यटकास वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी पार्किंग फुल्ल असे सांगून हात झटकत आहेत, नाइलाजास्तव पर्यटकांना परत जावे लागत आहे.
तसेच येथील मूळवासीय संघटनेच्या घोडेवाल्यांनी याच कार पार्किंगमध्ये घोडे उभे केल्याने या संघटनेचे घोडे, माल वाहतुकीचे घोडे यांच्यामुळे आलेल्या पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वन व्यवस्थापन समिती व वन विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प असा प्रकार सध्या पाहावयास मिळत आहे.
घोडा स्टॅण्डची जागा व येथे असलेले रेस्टॉरंट या जागा जर खाली करून घेतल्या तर येथे पर्यटकांची ५० ते ६० वाहने पार्किंगमध्ये लागू शकतात. परंतु यावर कारवाई करण्यास वन विभागाचे व वन व्यवस्थापन समितीचे अधिकारी उदासीन दिसत आहेत.
हे बेकायदा असलेले रेस्टॉरंट व घोडा स्टँड यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करणार असून, लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करणार आहोत.
- गिरीश पवार, वन व्यवस्थापन समिती, अध्यक्ष