पुरेशा बस नसल्याने घरौंदातील रहिवाशांची मोठी गैरसोय
By नामदेव मोरे | Updated: February 7, 2024 18:35 IST2024-02-07T18:32:24+5:302024-02-07T18:35:42+5:30
एनएमएमटीच्या आणखी मार्गांवरील बस वळवा : स्थानिकांची मागणी

पुरेशा बस नसल्याने घरौंदातील रहिवाशांची मोठी गैरसोय
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीचा सर्वात मोठा डेपो घणसोलीत आहे. येथून नवी मुंबईतील विविध नोडसह उरण-पनवेल परिसरात अनेक मार्गांवर एनएमएमटीच्या बस धावतात. मात्र, यातील मार्ग ९ वाशी रेल्वे स्टेशन वगळता इतर सर्व बस सिम्प्लेक्समार्गे धावतात. यामुळे घरौंदा आणि नजीकच्या माथाडी वसाहतीतील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने त्यांनी घरौंदामार्गे आणखी काही मार्गांवरील इतर बस मार्ग वळविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सध्या वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणारी ९ क्रमांकाची जी बस आहेे, तिच्या फेऱ्या अतिशय अनियमितपणे धावतात. कधी पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर तीन-चार बस ये-जा करतात. तर कधी अर्धा तास बस नसते. घरौंदा परिसरात तेथील चार मोठ्या सोसायटी, एएसपी शाळा व ज्युनिअर महाविद्यालय आहे. शिवाय अनेक माथाडींच्या बैठ्या वसाहती आहेत. या सर्व रहिवाशांसाठी एकाच मार्गावरील बस उपलब्ध असते. त्यामुळे त्यांना वाशी-कोपरखैरणे वा अन्य ठिकाणी जायचे असल्यास पंचवटी चौकात येऊन बस पकडावी लागते. यामुळे एएसपी स्कूल, घरौंदामार्गे आणखी काही मार्गांवरील इतर बस मार्ग वळविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.