खंडित विजेमुळे नागरिकांमध्ये संताप
By Admin | Updated: July 16, 2016 02:01 IST2016-07-16T02:01:07+5:302016-07-16T02:01:07+5:30
चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

खंडित विजेमुळे नागरिकांमध्ये संताप
उरण : चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
विजेच्या खेळखंडोब्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सेनेचे तालुका संपर्क प्रमुख संतोष ठाकूर, उरण पं. स. चे सभापती भास्कर मोकल यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील महावितरण कार्यालयावरच धडक दिली. आठ दिवसांत वीज मंडळाच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
उरण परिसरात वीज गायब होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटल्याचे, तसेच वीज खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.
चिरनेर, कोप्रोली आणि ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा तत्काळ बदलण्यात याव्या, चिरनेरसाठी २५ नवीन विद्युत पोल उपलब्ध करून द्यावेत आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, याशिवाय जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व वीज खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशा मागण्याही उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.
आठ दिवसात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. (वार्ताहर)
पनवेल : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे होत आली असली तरी पनवेल तालुक्यातील १० आदिवासी वाड्यांमध्ये अद्याप वीज पोहचू शकलेली नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील काही आदिवासी वाड्या आजही अंधारात चाचपडत आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो आदिवासी वाड्या आहेत. पैकी सागवाडी, वाघाचीवाडी, नेताली मानपाडा, करवली वाडी, पेंधर आदिवासीवाडी, वलप आदिवासीवाडी, वावंजा आदिवासीवाडी, सांबरमाल,कामतवाडी, कुंडेवहाळ कातकरवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आजतागायत वीज पोहोचलेली नाही. करवलीवाडीत ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे. मात्र त्यास वनखात्याकडून हरकत घेण्यात आल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही.