पारपत्रासाठी पायपीट करण्याच्या जाचातून शहरवासीयांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:14 IST2019-07-13T23:14:00+5:302019-07-13T23:14:04+5:30
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना पारपत्र अर्थात पासपोर्ट कार्यालय मिळाले आहे.

पारपत्रासाठी पायपीट करण्याच्या जाचातून शहरवासीयांची सुटका
नवी मुंबई : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना पारपत्र अर्थात पासपोर्ट कार्यालय मिळाले आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात शनिवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी होणाऱ्या जाचातून नवी मुंबईकरांची आता सुटका झाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे येथे जावे लागत असे. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्याने नवी मुंबईसाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू करावी, अशी शहरवासीयांची जुनी मागणी होती. त्यानुसार माजी खासदार संजीव नाईक यांनी सुरुवातीच्या काळात त्यासाठी काही प्रमाणात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा सुरू केला. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळविण्यात ते यशस्वी ठरले; परंतु विविध कारणांमुळे त्याच्या अंमलबजावणीस विलंब झाला. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विचारे यांनी वाशी येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवेचे औपचारिक उद्घाटन केले; परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता न झाल्याने शहरवासीयांच्या दृष्टीने हे कार्यलय निरुपयोगी ठरले. त्यामुळे पुन्हा निवडून येताच त्यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन नवी मुंबईकरांना अखेर स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय मिळाले.
दरम्यान, शनिवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे तसेच महाराष्ट्र सर्कलचे मुख्य टपाल अधिकारी हरिश्चंद्र अग्रवाल, नवी मुंबईचे टपाल अधिकारी शोभा मधाळे, क्षेत्रीय अधिकारी तुलसीदास शर्मा, पासपोर्ट सहायक अधिकारी विशाल हिवाळे आदी उपस्थित होते.
>नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या सेवा केंद्रात सध्या दोन पोस्टल सहायक अधिकारी व एक पासपोर्ट पडताळणी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी दिवसाला २० अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीनंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून साधारण तीन ते चार दिवसांत संबंधितांना घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. वाशी येथील पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नवी मुंबईसह पनवेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.