पोलिसांकडून नियम धाब्यावर

By Admin | Updated: October 28, 2015 01:08 IST2015-10-28T01:08:02+5:302015-10-28T01:08:02+5:30

वाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत

Regulatory rules from the police | पोलिसांकडून नियम धाब्यावर

पोलिसांकडून नियम धाब्यावर

नामदेव मोरे, नवी मुंबई
वाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. बेलापूरमधील पोलीस मुख्यालयाबाहेरच रोडवर बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. रस्ता अडविणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
सिडकोने नवी मुंबईचे केलेले नियोजन फसले आहे. शहरामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. शहरातील वाहनांची संख्या ३,५८,६३९ एवढी झाली आहे. दुचाकी वाहनांची संख्या १ लाख ७० हजार ६३३ आणि कारची संख्या १ लाख १४ हजार ६७३ एवढी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची संख्याही तब्बल ७३ हजार झाली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात वाहनतळ विकसित केलेले नाहीत. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे नाईलाजाने नागरिकांना रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. परंतु रोडवर उभ्या केलेल्या वाहनांवर तत्काळ वाहतूक पोलीस कारवाई करतात. गतवर्षी नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्याप्रकरणी तब्बल ७३,५८१ वाहनांवर कारवाई केली होती. रोज सरासरी २०० ते २५० वाहनांवर कारवाई केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असताना पोलीस स्वत: मात्र वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. सीबीडीमधील पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर दोन ते तीन लेनमध्ये वाहने उभी केली जात आहेत. कोकण भवनकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
वाहतूक पोलीस दोन लेनमध्ये वाहने उभी केल्यास सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करतात. परंतू पोलीस मुख्यालयाबाहेर स्वत: पोलीसच बेशिस्तपणे वाहने उभी करत असताना त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. स्वत: पोलीसच वाहतुकीचे नियम तोडत आहेत. मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर केला जात नाही. बहुतांश सर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर पदपथावरही वाहने उभी करून ठेवली जात आहेत. कायद्याचे रखवालदारच नियम तोडत असताना त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली नाही तर पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
सामान्य नागरिकांनी रोडच्या कडेला वाहन उभे केले की तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. पदपथावरील वाहनेही उचलली जात आहेत. वाहतुकीस अडथळा नसलेल्या वाहनांवरही कारवाई होते.
परंतु दुसरीकडे पोलीस मात्र स्वत:च रोडवर जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. कायद्यापेक्षा पोलीस मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून सर्वांना समान न्याय हवा, अशी अपेक्षा केली जात आहे.

Web Title: Regulatory rules from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.