‘नैना’तील विकास शुल्कात कपात

By Admin | Updated: August 31, 2016 03:36 IST2016-08-31T03:36:12+5:302016-08-31T03:36:12+5:30

नैना क्षेत्रात बांधकामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या विकास शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे.

Reduction of development fees in Naina | ‘नैना’तील विकास शुल्कात कपात

‘नैना’तील विकास शुल्कात कपात

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
नैना क्षेत्रात बांधकामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या विकास शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. हे दर त्या त्या विभागातील रेडिरेकरनच्या दरानुसार असणार आहेत. विकासकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मरगळलेल्या विकास कामांना गती मिळण्याची शक्यता बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
नैना योजनेत सहभागी होणाऱ्या भूधारकांसाठी सिडकोने दोन टप्पे तयार केले आहेत. यातील पहिला टप्पा १0 हजार हेक्टरचा असून त्यातील ६0 टक्के जमिनीवर भूधारकारकाला विकास करता येणार आहे. तर उर्वरित ४0 टक्के जमीन सिडको विनामोबदला घेणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ७.५ ते १0 हेक्टर जमिनीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. यातील जमिनीची विभागणी फिफ्टी-फिफ्टी करण्यात आली आहे. या दोन्ही टप्प्यातील भूधारकांना अनुक्रमे १.७ आणि २ इतके चटई निर्देशांक दिला जाणार आहे. नैना योजनेत सहभागी न होणाऱ्या भूधारकांना आपल्या भूखंडांच्या विकासासाठी प्रति चौरस मीटर २३00 रूपये इतके विकास शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क या परिसरातील जमिनीच्या किमतीपेक्षा अधिक असल्याची ओरड बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. तसेच त्यामुळे बजेटमधील घरांना खीळ बसेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने नगरविकास विभागातील छाननी समितीच्या शिफारसीवरून सिडकोने विकास शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रति चौरस मीटर २३00 रूपये इतके विकास शुल्क प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात सुधारणा करून ते या रकमेच्या ३0 टक्के इतके करण्यात आले आहे. हे शुल्क अकृषिक जमिनीसाठी त्या त्या क्षेत्रातील प्रचलित रेडिरेकनरच्या दरानुसार असणार आहे. म्हणजेच्या सध्याच्या रेडिरेकनर दरानुसार विकास शुल्काची ही रक्कम प्रति चौरस मीटर ९00 ते १८00 रूपये प्रति चौरस मीटर इतकी असेल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत सिडकोने नव्या सुधारणांसह सुधारित आराखडा नगर विभागाच्या छाननी समितीला सादर केला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील टीडीआरसंदर्भातही महत्त्वपूर्ण बदल केल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील टीडीआरसंदर्भातही महत्त्वपूर्ण बदल केल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, साधारण पुढील पंधरा दिवसांत नैनाच्या या प्रारूप विकास आराखड्याला नगरविकास विभागाची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Reduction of development fees in Naina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.