लाल बावट्याची सिडकोवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2015 01:01 IST2015-12-09T01:01:20+5:302015-12-09T01:01:20+5:30
लाल बावटे की जय! लाल झेंडे की जय ! या घोषणा देत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मंगळवारी सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयावर धडकले

लाल बावट्याची सिडकोवर धडक
पनवेल : लाल बावटे की जय! लाल झेंडे की जय ! या घोषणा देत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मंगळवारी सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयावर धडकले. नवीन पनवेल, खांदा वसाहतीतील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
सिडकोच्या जीर्ण झालेल्या इमारतींचे पुनर्विकास धोरण, अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाइन, सार्वजनिक शौचालय, समाज मंदिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, फेरीवाले हॉकर्स झोनकरिता जागा व लिज वाढवणे, खांदा वसाहती ते रेल्वे स्थानकात जाण्याकरिता सायन-पनवेल महामार्गावर ओव्हर ब्रिज बांधणे, खांदा कॉलनी शिवाजी चौकात सिग्नल बसवणे, खांदेश्वर मंदिराजवळचे मंदिर जनतेसाठी विनाशुल्क खुले करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी शेकापचे पनवेल शहर चिटणीस नगरसेवक प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते संदीप पाटील, नगरसेविका अनुराधा ठोकळ, नगरसेवक गणेश कडू यांचे शिष्टमंडळ आणि सिडको अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली.
सिडकोचे अधीक्षक अभियंता व पनवेल प्रशासक सुधाकर विसाळे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी शेकापक्षाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या मोर्चाला शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील आदींसह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)सिडकोसोबत झालेल्या चर्चेदरम्यान सिडकोने सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सिडको त्वरित यासंदर्भात कारवाई करणार आहे. मागण्यांमधील काही विषय हे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या अखत्यारीत येत आहेत. मात्र ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये असल्याने उर्वरित विषय त्यांच्यासमोर मांडण्यात येतील.
- संदीप पाटील,
विरोधी पक्षनेते,
पनवेल नगरपरिषद