सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू

By कमलाकर कांबळे | Updated: July 31, 2025 10:16 IST2025-07-31T10:15:58+5:302025-07-31T10:16:56+5:30

भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून  रिक्त असलेली पदे या वर्षात भरली जाण्याची शक्यता आहे.

recruitment will be done soon in cidco administration start process for 160 posts | सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू

सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :  शहररचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती. मात्र, आता सिडको व्यवस्थापनाने रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच १६० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात  चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे या वर्षात भरली जाण्याची शक्यता आहे.

सिडकोमध्ये सध्या मंजूर २७९७ पदांपैकी १६१९ पदे रिक्त आहेत. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. कामाचा हा भार आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता, कार्यक्षमता अबाधित ठेवण्यासाठी नव्या भरतीची गरज होती. याची दखल घेऊन सिडको प्रशासनाने २०२५ या वर्षात बॅकलॉक भरून काढण्याचे नियोजन केले आहे.  

तरुणांना संधी

अलीकडेच सिडकोमध्ये सहायक विकास अधिकारी व अभियंता संवर्गातील जवळपास १३० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली आहे. तिच्या माध्यमातून पहिला टप्पा पार पडला. मात्र, एवढ्यावरच न थांबता रिक्त असलेली विविध संवर्गातील पदे गरजेनुसार भरण्याचे सिडकोने ठरविले आहे.   त्यानुसार येत्या काळात सिडकोत नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध 
होणार आहे. 

पदोन्नती रखडली 

लेखा विभाग, सुरक्षारक्षक, अग्निशमन दल, गट-ड संवर्ग आणि तांत्रिक क्षेत्रातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. विशेषतः लेखापाल, लेखा सहायक, लिपिक, अग्निशमन अधिकारी, अभियंते, क्षेत्र अधिकारी अशा विविध संवर्गात पदोन्नती रखडल्या आहेत.  त्यामुळे  उच्चस्तरीय पदांसाठी नव्या उमेदवारांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यादृष्टीने सिडकोने व्यापक नियोजन सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

सिडकोच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. बॅकलॉग मोठा आहे. सध्या १३० पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही महिन्यांत आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरली जातील. व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. - डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको.

 

Web Title: recruitment will be done soon in cidco administration start process for 160 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.