सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यालयात भरती घोटाळा
By Admin | Updated: December 20, 2015 02:46 IST2015-12-20T02:46:09+5:302015-12-20T02:46:09+5:30
सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. २५ मराठी तरुणांकडून तब्बल १२ लाख रुपये घेऊन त्यांना खोटी

सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यालयात भरती घोटाळा
- नामदेव मोरे, नवी मुंबई
सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. २५ मराठी तरुणांकडून तब्बल १२ लाख रुपये घेऊन त्यांना खोटी नियुक्तीपत्रं देण्यात आली. पाच महिने काम केल्यानंतर बोर्डाने ही नियुक्तीपत्रे व सर्व कागदपत्रं खोटी असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्णाचे मुख्य कार्यालय नवी मुंबईमधील सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी आलेल्या तरुणांनी सुरक्षारक्षकाची नोकरी मिळावी, यासाठी सुरक्षारक्षक मंडळाकडे अर्ज केले होते. मंडळामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एम. जी. मिश्रा (नोंदणी क्रमांक ४८१८६) ‘मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो. मंडळातील सुरक्षा निरीक्षक एम. के. भोसले साहेब भरतीचे सर्व पाहतात’, असे सांगत भरतीसाठी ५० हजार रुपये व सुपरवायजरसाठी ६० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापूर्वी मिश्राने अनेकांना नोकरीस लावले होते. विशेष म्हणजे पाच ते सहा महिन्यांमध्ये हमखास नोकरी मिळवून दिली जात होती. यामुळे अनेक तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. या तरुणांकडून पैसे घेऊन त्यांना मुंबईतील विविध शासकीय आस्थापना व निवासी संकुलांमध्ये सुरक्षेसाठी तैनात केले. दोन ते तीन महिने या तरुणांच्या बँक खात्यांमध्ये पगारही जमा करण्यात आला. परंतु मागील दोन महिने पगार मिळत नसल्याने जवळपास २५ तरुणांनी सानपाडामधील बोर्डाच्या कार्यालयात विचारपूस केली असता, त्यांना दिलेली नियुक्तीपत्रे व इतर सर्व कागदपत्रं बोगस असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या तरुणांना धक्का बसला. ‘आम्ही सुरक्षारक्षकाची नोकरी करीत आहोत. दोन महिन्यांचा पगारही मिळाला असताना आता आमची कागदपत्रे बनावट कशी काय’, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मचाऱ्यांनी एम. के. भोसलेविषयी सांगितले, परंतु अशाप्रकारे कोणीही बोर्डात नोकरीला नसल्याचे सांगण्यात आले. फसविण्यात आलेल्या तरुणांनी सानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु त्यांची दखल घेतली नाही. पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही. काही कर्मचाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांकडे जाण्यास सांगितले. तरुण तेथेही गेले, परंतु उपायुक्त शहाजी उमाप बंदोबस्तावर असल्याने भेटू शकले नाहीत. तरुणांनी लोकमत कार्यालयात येऊन त्यांच्या व्यथा सांगितल्या.
‘आमची फसवणूक झाली असून, आमची कोणीच दखल घेत नाही. आमचे पैसे गेले त्याचे दुख नाही; आम्हाला नोकरी मिळावी एवढीच अपेक्षा आहे. अनेकांनी कर्ज घेऊन पैसे भरले आहेत. सुरक्षारक्षक मंडळ दखल घेत नसल्याने जायचे कुठे’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस उपायुक्तांकडे धाव
नोकरीसाठी पैसे घेऊन फसविण्यात आलेले सर्व तरुण मराठी आहेत. दोन दिवसांपासून ते सुरक्षारक्षक मंडळाच्या सानपाडा येथील मुख्य कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत. परंतु त्यांची दखल घेतली जात नाही. सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनीही तक्रार घेतली नाही.
शनिवारी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या कार्यालयात जाऊन आले, परंतु बंदोबस्तामुळे ते भेटले नाहीत. उमाप यांनी अवैध व्यवसायांविरोधात जोरदार मोहीम उघडली असल्यामुळे ते आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा या तरुणांनी व्यक्त केली आहे. आम्हाला आमची नोकरी परत मिळावी, असा आशावादही या तरुणांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी एम. जी. मिश्रा याने सुरक्षा निरीक्षक एम. के. भोसले यांच्या नावाने ६० हजार रुपये घेतले. नियुक्तीपत्र, पोलिसांचे चारित्र्य पडताळणी व सर्व गोष्टी रीतसर केल्या. नोकरी केल्यानंतर दोन महिने पगारही मिळाला; परंतु आता नियुक्तीपत्रं खोटी असल्याचे सांगितले जात आहे. - प्रशांत शिर्के, मीरा रोड
सुुरक्षारक्षक मंडळ मराठी मुलांसाठीच सुरू केले असल्याचे सांगून आमच्याकडून ६० हजार रुपये घेतले. सुरक्षा पर्यवेक्षकाची नोकरी दिली. अजूनही मी नोकरीवर कार्यरत आहे; परंतु आता मंडळाच्यावतीने आमची नियुक्ती झालीच नसल्याचे सांगितले.- प्रवीण वाघे
वांद्रे व मुंबईमध्ये विविध शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून चार महिने काम केले आहे. पगारही युनियन बँक खात्यात जमा झाला. आता अचानक आमची ड्युटी बंद झाल्याने चौकशी केली असताना आमची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा.
- नवनाथ चेतवडेकर, वडाळा