गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2023 16:38 IST2023-03-22T16:37:27+5:302023-03-22T16:38:09+5:30
कलिंगडची आवकही वाढली

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल
नवी मुंबई : बाजार समितीचे फळ मार्केट नवी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विक्रमी ६०,८६८ पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये ४७,४७५ पेटी हापूस आंब्याचा समावेश आहे. मुहूर्ताला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असून आंब्याबरोबरच कलिंगड, खरबूज यांची आवकही वाढली आहे.
देशात आंब्याची सर्वाधिक उलाढाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. प्रत्येक वर्षी ५०० कोटीपेक्षा जास्त आंबा येथे विकला जातो. येथून जगभरातही आंबा पाठविला जातो. आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी चक्क ६०,८६८ पेट्यांची आवक झाली असून हा आतापर्यंतचा मुहूर्ताचा विक्रम आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होत आहे. ४ ते ८ डझनची पेटी १५०० ते ४ हजार रुपये डझन दराने विकली जात आहे.
दक्षिणेकडील राज्यातून १३,३९३ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. दक्षिणेकडून बदामी, लालबाग, तोतापुरी व कर्नाटकी आंब्याची आवक होत आहे. बाजार समितीचे फळ मार्केट आंबामय झाले आहे. आंब्याबरोबर इतर फळांचीही आवक वाढली आहे. प्रतिदिन ७०० ते ८०० कलिंगड, २०० ते ३०० टन खरबूजची आवक होत आहे. द्राक्ष, अननस, संत्री, पपई यांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
एप्रिलमध्ये आवक कमी होणार
मुंबईमध्ये ३१ मार्चपर्यंत आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये आवक कमी होण्याची शक्यता असून मेमध्ये मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होणार आहे. जूनअखेरपर्यंत आंब्याची आवक सुरू राहणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला पहिल्यांदाच ६० हजारपेक्षा जास्त पेट्यांची आवक झाली असून ग्राहकांचाही प्रतिसाद वाढला आहे. आंब्याबरोबर कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्ष यांचीही आवक वाढली आहे.- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
आंब्याचे एपीएमसीमधील दर पुढीलप्रमाणे
हापूस - १५०० ते ४ हजार रुपये पेटी
बदामी - १२० रुपये किलो
लालबाग ५० ते ६० रुपये किलो
तोतापुरी ४० ते ५० रुपये किलो
कर्नाटकचा आंबा - ७० ते १३० रुपये किलो
इतर फळांचे होलसेलमधील प्रति किलो बाजारभाव
फळ - बाजारभाव
कलिंगड ६ ते १२
अननस २० ते ४५
द्राक्ष ४० ते ६०
पपई १६ ते ३०
संत्री ३० ते ७०
खरबूज २० ते ३०