नेरुळकरांच्या भावनांची रावतेंकडून खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:21 IST2019-08-27T23:21:41+5:302019-08-27T23:21:53+5:30

आरटीओच्या कार्यालयाचे भूमिपूजन : शुकशुकाटामध्ये जिवंतपणा येणार असल्याचे केले वक्तव्य

Rawate kidding about Nerulkar's feelings | नेरुळकरांच्या भावनांची रावतेंकडून खिल्ली

नेरुळकरांच्या भावनांची रावतेंकडून खिल्ली

नवी मुंबई : आरटीओच्या नेरुळ येथील प्रस्तावित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या हस्ते करण्यात आले; परंतु रहिवासी भागात आरटीओचे कार्यालय झाल्यास शांतता भंग होण्याच्या भीतीने रहिवाशांनी या कामास विरोध दर्शवला आहे. अशातच ‘आरटीओच्या कार्यालयामुळे परिसरातील शुकशुकाटामध्ये जिवंतपणा येईल’ अशा प्रकारचे वक्तव्य करून रावते यांनी नेरुळकरांच्या भावना दुखावल्या आहेत.


नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वत:ची जागा नसल्याने गेली अनेक वर्षांपासून एपीएमसीमधील भाडेतत्त्वावरील जागेत कार्यालय चालवले जात आहे. त्याठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने विविध कामानिमित्ताने येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. तर ब्रेक टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट यासाठी देखील आरटीओकडे प्रशस्त जागा नाही. यामुळे नवी मुंबई आरटीओसाठी स्वतंत्र जागा मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर सिडकोने नेरुळ सेक्टर १३ येथील ८ व ९ क्रमांकाचा भूखंड आरटीओसाठी दिला आहे. परिणामी त्याभोवतीची दोन सुसज्ज उद्याने तसेच सेक्टर १३, १७ व १९ या रहिवासी भागातली शांतता भंग होणार आहे. यामुळे आरटीओला भूखंड वितरित झाल्यापासून स्थानिकांचा विरोध आहे. यानंतरही मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आरटीओच्या प्रस्तावित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याकरिता परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यानंतरही नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी रहिवाशांसह कार्यक्रमस्थळी निषेध नोंदवला. त्यांच्या शिष्टमंडळाने रावते यांची भेट घेऊन आरटीओच्या कार्यालयामुळे भविष्यात उद्भवणाºया समस्यांची माहिती दिली. तसेच रहिवासी क्षेत्रापासून लांब अथवा औद्योगिक क्षेत्रात आरटीओचे प्रस्तावित कार्यालय हलवण्याची मागणी केली.


आरटीओच्या जागेविरोधात काही दिवसात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रहिवासी भागात आरटीओचे कार्यालय झाल्यास तिथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढणार आहे, तर परिसरात सार्वजनिक वाहनांच्या पार्किंगचीही सोय नाही. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या ९ मीटरच्या रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन पार्किंगचीही समस्या भेडसावणार आहे. त्याशिवाय परिसरातील ध्वनी व वायुप्रदूषणातही वाढ होणार आहे. यापैकी कोणत्याच बाबींचा आढावा न घेता चुकीच्या पद्धतीने नेरुळच्या रहिवासी भागात आरटीओच्या कार्यालयासाठी जागा देण्यात आल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी ठरावीक कार्यालयांचाच विकास झाला
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ कराडमधीलच आरटीओ कार्यालयाचा सुधार केला, तर बारामतीचेही आरटीओ कार्यालयही सुसज्ज बनवण्यात आले आहे. त्यामुळे ठरावीक कार्यालये वगळता दुर्लक्षित झालेल्या इतर सर्वच आरटीओ कार्यालयांचा मागील पाच वर्षांत विकास झाला असल्याचा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काँग्रेस सरकारला मारला. तसेच परिवहन खात्यातून येणारा महसूल गतीने वाढत असून, त्यातून विविध विकासकामे केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय आॅनलाइनमुळे कामकाजात पारदर्शकता आली असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमास शिवसेना उपनेते विजय नाहटा, परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, विठ्ठल मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले आदी उपस्थित होते.

आरटीओच्या जागेचे भूमिपूजन केल्यानंतर त्यापासून काही अंतरावरील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सभेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्याकडून मुलांना शाळेत सोडण्यासाठी अथवा नेण्यासाठी आलेल्या पालकांनाही थांबण्यास मज्जाव घातला जात होता. याचा पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शाळा सुरू असताना शाळेच्या आवारात कार्यक्रम घेतलाच कसा असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Rawate kidding about Nerulkar's feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.